चेस्टर-ली-स्ट्रीटः कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक साजरे करीत सलामीवीर ख्रिस रॉजर्सचे आणि शेन वॉटसनच्या मदतीने कांगारुचा डाव सावरला. इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात ५ बाद २२२ धावांपर्यंत मजल मारली. त्या वेळी रॉजर्स १०१ , तर ब्रॅड हॅडीन १२ धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पहिला डाव २३८ धावांत गुंडाळला.
दुस-या दिवशी डावाची सुरूवात झाली तेंवहा इंग्लंडला कालच्या धावसंख्येत एकाही धावेची भर घालता आली नाही. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या ९ बाद २३८ धावा झाल्या होत्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ब्रेसनन १२ , तर जेम्स अँडरसन १६ धावांवर खेळत होता. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच षटकात बर्डने अँडरसनचा त्रिफळा उडविला आणि इंग्लंडचा डाव आटोपला.
ऑस्ट्रेलियाची सुरूवात निराशजनक झाली. पहिल्या डावात ४ बाद ७६ अशी बिकट अवस्था झाली होती. मात्र , सलामीवीर रॉजर्स आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या वॉटसन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला. ब्रॉडने वॉटसनला बाद करत ही जोडी फोडली. वॉटसनने १३४ चेंडूंत सात चौकारांसह ६८ धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने ४२ धावांत चार विकेट्स, तर रायन हॅरिसने ७० धावांत दोन आणि जॅकसन बर्डने ५८ धावांत दोन विकेट्स घेतल्या. संक्षिप्त धावफलकः इंग्लंडः पहिला डाव – ९२ षटकांत सर्वबाद २३८ वि. ऑस्ट्रेलिया ः पहिला डाव – ५ बाद २२२ (ख्रिस रॉजर्स खेळत आहे १०१ , शेन वॉटसन ६८ , स्टुअर्ट ब्रॉड ४-४८).