पाकिस्तानी लष्कराचा पुन्हा गोळीबार

जम्मू – पाकिस्तानच्या सैन्यांनी जम्मू विभागातील पूंछ जवळ केलेल्या गोळीबारात पाच भारतीय जवान शहीद होण्याच्या घटनेनंतर सहा दिवसांनी शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा याच भागात प्रचंड गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्यांनी या घटनेमध्ये ७००० गोळ्या झाडल्या आणि तोफांचे गोळे फेकले. या गोळीबारात भारताच्या बाजूने प्राणहानी झाली नसली तरी अलीकडच्या काळातले हे नियंत्रण रेषेचे सर्वात मोठे उल्लंघन असल्याचे भारताच्या लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे.

हा गोळीबार पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील दुर्गा बटालियनच्या भागात झाला. त्याला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिले. पाकिस्तानी जवानांनी हा मारा करण्यासाठी मिडियम मशिनगन्स्, रॉकेट आणि छोट्या रणगाड्यांचा वापर केला. त्याला भारताने चोख उत्तर दिले असले तरी पाकिस्तानच्या हद्दीत सुद्धा त्यामुळे प्राणहानी झालेली नाही. पाकिस्तानने वापरलेले रणगाडे आणि रॉकेट शक्तीशाली असल्यामुळे काही तोफगोळ्यांचे आवाज पूंछ शहरापर्यंत ऐकू गेले. त्यामुळे या भागातल्या जनतेत घबराट निर्माण झाली. भारताचे संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी पाकिस्तानचा हा हल्ला निषेधार्ह असल्याचे म्हटले असून त्याचे फार गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.