महाराष्ट्रात पुरूष आत्महत्या करण्यात आघाडीवर

पुणे – महाराष्ट्रात २०१२ सालात नोंदल्या गेलेल्या एकूण आत्महत्त्यात पुरूष महिलांच्या तुलनेत आत्महत्त्या करण्यात आघाडीवर असल्याचे पोलिस महासंचालक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. गतवर्षात राज्यात १६११२ जणांनी आत्महत्या केल्या त्यात परूषांची संख्या ११३०४ इतकी आहे. २०११ सालच्या तुलनेत ही संख्या १६५ ने वाढली आहे.

राज्यात आत्महत्त्येच्या घटनांत राजधानी मुंबई प्रथम क्रमांकावर आहे. मुंबईत ७६२ पुरूष व ५३४ महिलांनी आत्महत्त्या केल्या तर पुण्यात हेच प्रमाण ४९६ पुरूष आणि २१६ महिला इतके आहे. या आकडेवारीत पुण्याचा नंबर दुसरा असून त्यापाठोपाठ ठाणे ३८३ पुरूष १८३ महिला , नाशिक -१७१ पुरूष व ९० महिला यांचा नंबर आहे.

या संदर्भात मानसोपचार तज्ञांनी कांही मते नोंदविली आहेत. डॉ. हरिश शेट्टी यांच्यामते राज्यात मुलांच्या आणि मुलींच्या जन्मदराचा रेशो १ हजाराला ९२२ इतकाच आहे हे जसे कारण आहे तसेच आत्महत्त्येच्या प्रयत्नात पुरूष महिलांच्या तुलनेत अधिक यशस्वी होतात हेही कारण आहे. अनेकवेळा महिलांच्या आत्महत्येत कुटुंबिय अशी आत्महत्त्या अपघात दाखविण्यात यशस्वी होतात तसेच राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढल्याने पुरूषांचा आकडा वाढलेला दिसत आहे. राष्ट्रीय गुन्हे विभागाच्या आकडेवारीनुसार २०१२ सालात ३७८६ शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्या आहेत.

अन्य एक तज्ञांच्या मते महिला धाक दाखविण्यासाठी आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न करतात तर पुरूष आत्महत्या करताना असा मार्ग निवडतात की ज्यात जिवंत राहण्याची शक्यता अगदी कमी असते. उदाहरण द्यायचे तर महिला झोपेच्या गोळ्या घेणे पसंत करतात तर पुरूष धावत्या रेल्वेखाली जीव देण्याचा मार्ग अवलंबतात. तसेच महिलांच्या तुलनेत पुरूषांवर आर्थिक ताण जादा असतो असेही त्यांचे म्हणणे आहे.