मुंबई – रशियाची मारिया शारापोव्हा ही जगातली सर्वात श्रीमंत महिला अॅथलीट ठरली आहे. मारिया शारापोव्हा निव्वळ वर्षभरातली कमाई खरोखरच थक्क करून टाकणारी आहे. पण जगातल्या सर्वात श्रीमंत पुरुष अँथलिटची कमाई तिच्यापेक्षाही अडीचपट अधिक आहे. रशियाची टेनिसब्युटी मारिया शारापोव्हा जगातली सर्वात श्रीमंत महिला अॅथलीट ठरली आहे.
जगातली सर्वात श्रीमंत महिला अॅथलीट ठरली मारिया
फोर्बस मॅगझिननं प्रसिद्ध केलेल्या या यादीत मारियानं सलग नवव्या वर्षी टॉपचं स्थान मिळवलं. जून 2012 ते जून 2013 या कालावधीत मारिया शारापोव्हानं तब्बल 2.9 कोटी डॉलर्सची कमाई केली आहे. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 174 कोटी इतकी भरते. जगातल्या सर्वात श्रीमंत महिला अॅथलिट्सच्या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर टेनिसबालाचं निर्विवाद वर्चस्व दिसून येतं.
पहिल्या दहा क्रमांकात सातजणी टेनिसपटू आहेतच, पण पहिले चार क्रमांकही त्यांनीच पटकावले आहेत. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली अमेरिकेची सेरेना विल्यम्स सर्वात श्रीमंत महिला अॅथलिट्सच्या यादीत दुसर्या स्थानावर आहे. तिनं गेल्या वर्षात 2.05 कोटी डॉलर्सची कमाई केली आहे. भारतीय चलनात ती रक्कम अंदाजे 123 कोटी इतकी भरते.
चीनची ली ना तिसर्या क्रमांकावर असून, तिची वर्षभरातली कमाई 1.82 कोटी डॉलर्सची आहे. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 109 कोटी इतकी भरते. बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेन्का चौथ्या क्रमांकावर असून, तिनं वर्षभरात 1.57 कोटी डॉलर्सची कमाई केली आहे. भारतीय चलनात ही रक्कम 94 कोटी रुपये भरते.
फोर्बसच्या यादीतला सर्वात श्रीमंत पुरुष अॅथलीट ठरण्याचा मान गोल्फवीर टायगर वूडला मिळाला आहे. एका वर्षातली त्याची कमाई 7.8 कोटी डॉलर्स भरते. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 468 कोटी रुपयांच्या घरात जाते. याचा अर्थ मारिया शारापोव्हाच्या तुलनेत टायगर वूडची कमाई ही अडीच पटीपेक्षाही अधिक आहे.
