भारताच्या उत्तरेला आणि पश्चिमेला अनुक्रमे चीन आणि पाकिस्तान यांनी सातत्याने भारताच्या खोड्या काढायला सुरूवात केली आहे. त्या संबंधात एखादी बातमी प्रसिध्द झाली की भारतीय जनतेच्या भावना भडकतात आणि या दोन खोडकर देशांना भारताने चोख उत्तर दिले पाहिजे अशी मागणी जनतेतून व्हायला लागते. परंतु भारताचे परराष्ट्र धोरण इतके दुबळेपणाचे आहे की भारत सरकार त्यांना चोख उत्तर तर देत नाहीच पण या दोन देशाकडून भारताला धोका आहे हेच मान्य करत नाही. एखाद्या समस्येवर उत्तर शोधायचे असेल तर धाडसाने त्या समस्येला भिडावे लागते. परंतु मुळात प्रश्नाचे अस्तित्वच मान्य नसेल तर ते मान्य नसणारा माणूस उत्तर कसा शोधू शकेल? भारताच्या परराष्ट्र खात्याची अवस्था नेमकी अशीच झालेली आहे. भारत या सरकार या प्रश्नांची दखलच घ्यायला तयार नाही आणि जेव्हा ते दखल घेते तेव्हा त्या प्रश्नाचे सरकारला झालेले आकलन अतीशय चुकीचे आहे असे लक्षात येते. त्यामुळे भारताच्या सीमा चीनच्या बाजूने कुरतडल्या जात आहेत आणि पाकिस्तान सातत्याने ताबा रेषा ओलांडून भारतीय हद्दीत येऊन काश्मिरचा प्रश्न जिवंत ठेवण्याची आपली राजनीती यशस्वीपणे राबवत आहे.
परराष्ट्र खात्याचे अपयश
भारताकडे जगातले तिसर्या क्रमांकाचे मोठे लष्कर आहे. शस्त्रास्त्र सज्जता तर उत्तम आहेच पण भारत ही अण्वस्त्रधारी शक्ती आहे. भारताचे लष्कर प्रमुख आणि संरक्षण मंत्री, हा देश स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम असल्याची ग्वाही वारंवार देत असतात. मे महिन्यामध्ये पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करून दोघां सैनिकांची हत्या केली, त्यातल्या एकाचे शिर कापून नेले तेव्हा देशवासियांना असा प्रश्न पडला की पाकिस्तानसारखा छोटा देश जगातल्या तिसर्या क्रमांकाची लष्करी सिध्दता असलेल्या या देशाची अशी खोडी कशी काढू शकतो? या प्रकाराने भारतीयांच्या मनात प्रक्षोभ निर्माण झाला. परंतु त्याला प्रतिसाद देणारी कसली खंबीर कृती आपले सरकार करू शकले नाही. त्यावेळी लष्कर प्रमुखांनी मात्र अशी घोषणा केली की, सरकारने आदेश दिला तर भारताचे लष्कर काही मिनिटांमध्ये पाकिस्तानला नामशेष करू शकेल. भारताच्या लष्कराची ही सिध्दता निर्विवाद आहे. परंतु आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला एक शाप आहे. आपले बहादूर जवान मैदानात पकिस्तानलाच काय चीनलासुध्दा धूळ चारू शकतात. पण आपले सरकार वाटाघाटीच्या टेबलावर दुबळेपणा करून सैनिकांचा पराक्रम मातीमोल करून टाकते. म्हणूनच सामर्थ्यशाली लष्कर असूनसुध्दा शेळपट परराष्ट्र धोरणामुळे आपल्याला सातत्याने पाकिस्तानचे हल्ले सहन करावे लागतात.
आपण पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले तर त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होतील याची चिंता आपण करत बसतो. पण भारताची खोडी काढताना पाकिस्तानच्या सरकारला तशी भीती वाटत नाही आणि पाकिस्तानने कितीही आगळिक केली तरी तिचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कसलेच परिणाम होत नाहीत. तेव्हा आपल्या चोख कृतीमुळे जगात काय घडेल ही भारत सरकारची भीती निराधार आणि अनाठायी आहे असे वाटते. भारत सरकार जोपर्यंत या भितीच्या बाहेर येणार नाही. तोपर्यंत भारताची मानहानी करणारे आणि भारतीयांना प्रक्षुब्ध करणारे पाकिस्तानचे भ्याड हल्ले चालूच राहणार आहेत. भारत सरकार किती दुबळेपणाने वागते याचे प्रत्यंतर काल संसदेत आले. पाकिस्तानी लष्कराने भारतीय हद्दीत अगदी पूंछपर्यंत येऊन पाच भारतीय जवानांचे प्राण घेतले. यावर संसदेत चर्चा सुरू झाली तेव्हा, अजून या घटनेचे तपशील हाती येण्याच्या आधीच संरक्षण मंत्री ऍन्टनी यांनी पाकिस्तान सरकारला क्लीन चिट देऊन टाकली. हा हल्ला पाकिस्तानी लष्कराने केलेला नसून लष्करी वेशात आलेल्या अतिरेक्यांनी केलेला आहे. तेव्हा या हल्ल्यासाठी पाकिस्तान सरकारला किंवा लष्कराला दोषी धरून चालणार नाही असा खुलासा त्यांनी करून टाकला.
हा खुलासा भारताचे संरक्षण मंत्री करत आहेत की पाकिस्तानचे संरक्षण मंत्री करत आहेत असा प्रश्न क्षणभर पडला. जोपर्यंत पाकिस्तानचे लष्कर स्वतः भारतावर हल्ला करीत नाही तोपर्यंत चोख उत्तर देण्याचा विचार आपण करता कामा नये अशी भारत सरकारची परराष्ट्र नीती आहे की काय असा प्रश्न पडतो. या नीतीच्या मागे एक वेगळे विश्लेषण दडलेले आहे. पाकिस्तान हे विलक्षण गोंधळ माजलेले राष्ट्र आहे. तिथे अतिरेकी चळवळ मोठ्या प्रमाणावर आहे आणि तिच्यावर सरकारचे नियंत्रण नाही. अशा या अनियंत्रित अतिरेक्यांनी भारतीय हद्दीत घुसून हल्ला केला तर तो हल्ला पाकिस्तानचा हल्ला मानता कामा नये. उलट त्या हल्ल्याबद्दल पाकिस्तान सरकारचा सुध्दा नाईलाज झालेला असतो. बिचारे पाकिस्तान सरकार या हल्लेखोरांना रोखू शकत नाही तेव्हा असा हल्ला झाला तरीसुध्दा पाकिस्तानच्या सरकारला क्लीन चिट दिली पाहिजे आणि अशा हल्ल्यांना उत्तर देण्याची काही गरज नाही. अशा प्रकारचे हे विश्लेषण आहे आणि पाकिस्तानी हल्ल्याचे भारत सरकारचे हे आकलन भारतासाठी धोक्याचे आहे.
