राणे-शिवसेना संघर्षावर पहिल्यांदाच व्यक्त झाले राज ठाकरे


मुंबई – राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवावर बंदी घातली आहे. पण काही ठिकाणी सरकारचे नियम डावलूनही दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सव मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही साजरा केला. राज ठाकरे यांनी याच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून त्याचबरोबर राज्यातील नारायण राणे-शिवसेना संघर्षावरही आपली पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात सर्व गोष्टी चालूच आहेत की, जे नारायण राणेंच्या विरोधात झाले, यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. बाकीच्या सगळ्यांचे मेळावे सुरु आहेत. भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरे सुरु, बाकीच्यांनी मंदिरात जायचे नाही. यांनी मेळावे, सभा घ्यायच्या पण आम्ही दहीडंही साजरी करायची नाही. कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का ? क्रिकेट, फुटबॉल मैदानांमध्ये खेळले जात आहेत. सरकारकडून महापौर बंगल्याजवळ कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या नाहीत. मग सणांवरच का निर्बंध येतात? अशी विचारणा राज ठाकरेंनी केली आहे.

राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवरही टीका केली आहे. ते म्हणाले, जन आशीर्वाद यात्रा झाली ती चालली. तुमचा लॉकडाउन तेव्हा नाही. सण आला की लॉकडाउन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या जन आशीर्वाद यात्रेतून, मेळाव्यांमधून, हाणामाऱ्यांमधून नाही. हवे तेवढे वापरायचे आणि जनतेला घाबरवायचे काम सुरु आहे.