बाबरी पाडणार असल्याची राष्ट्रपतींना माहिती होती

नवी दिल्ली – १९९२ साली अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडली जाण्याच्या आधीच तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना त्याची माहिती होती, असा खळबळजनक गौप्यस्ङ्गोट समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना केला. भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवाराने मशीद पाडण्याचे ठरवले होते याची आपल्याला माहिती होती आणि त्यामुळे आपण चार डिसेंबर रोजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिली होती. डॉ. शर्मा यांनी राष्ट्रपती पदाच्या अधिकारात या घटनेत हस्तक्षेप करावा आणि ही घटना टाळावी अशी मागणी करणारे एक पत्र आपण त्यांना दिले होते, असेही मुलायमसिंग यादव यांनी सांगितले.

आपले हे पत्र डॉ. शर्मा यांनी वाचले आणि त्यावर त्यांनी चर्चा सुद्धा केली. मात्र थोड्या वेळाने आजूबाजूला संशयाने पहात त्यांनी, ‘मला हे माहीत आहे हे कोणालाही सांगू नका’ अशी विनंती आपल्याला केली. एवढेच नव्हे तर बाबरी मशीद नक्की पाडली जाईल हे आपल्याला या आधीच माहीत होते, असेही ते म्हणाले अशी खळबळजनक माहिती मुलायमसिंग यांनी दिली.

त्यावेळी केंद्रात पी.व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे सरकार होते. त्या सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या आपण भेटी घेतल्या आणि त्यांना ६ डिसेंबर १९९२ रोजी होणार असलेल्या या घटनेची पूर्वकल्पना दिली. त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला, पण कोणीही आपले म्हणणे ऐकून घेतले नाही असेही मुलायमसिंग यांनी सांगितले.

बाबरी मशिदीच्या निमित्ताने झालेले राजकारण आणि त्यात आपल्याला आलेले अनुभव यावर आपण एक पुस्तक लिहिणार होतो. पुस्तकाची काही पाने लिहून सुद्धा झाली होती, परंतु आपण काही लिहायला गेलो असतो तर अनेक नेत्यांचे पितळ उघडे पडले असते म्हणून आपण पुस्तक लिहिण्यापासून परावृत्त झालो, असेही मुलायमसिंग म्हणाले.