अल-कायदाची अमेरिकेला भिती!

वॉशिंग्टन – अमेरिकेने सर्व विमानतळी आणि महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. एवढेच नाही, तर विविध 22 दुतावासही बंद करण्यात आली आहेत. कारण एकच.. अमेरिकेला भिती वाटतेय अल कायदाची संपूर्ण अमेरिकेला हादरवून टाकणा-या अल कायदा या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा हल्ल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दस्तूरखुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या संपूर्ण परिस्थितीची स्वत: पाहणी करत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान रिच यांच्या अध्यक्षतेखाली सर्व वरिष्ठ सुरक्षा अधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना रण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात अल-कायदाने दहशतवादी हल्ला करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र ही धमकी नेमकी कुठून येत आहे याबाबत कोणतीही माहिती कळू शकलेली नाही.

ओबामांच्या निर्देशानुसार रिच सर्व परिस्थितीची पाहणी करत आहेत. जगभरातील अमेरिकेचे 22 दुतावास बंद करण्याचे पत्र शुक्रवारी सर्व ठिकाणी पाठवण्यात आले. दरम्यान, अफगाणिस्तानातील जलालाबाद शहरातील भारतीय दुतावासाबाहेर शनिवारी आत्मघातकी हल्ला झाला.त्यात 12 जण ठार झाले.