सुशीलकुमार शिंदेवर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. काल रात्रीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 71 वर्षांच्या सुशीलकुमार शिंदे यांना फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता. यासाठीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे त्यांची मुलगी आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

डॉ. आर. देशपांडे आणि ए. जोग यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ही एक छोटी शस्त्रक्रिया असून, काही दिवसांपूर्वी ती करण्याचे ठरविले होते. त्यानुसार आज त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सुशीलकुमार शिंदे यांनी तीन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांना दोन -तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.

सुशीलकुमार शिंदे शनिवारी नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या कार्यक्रमाला आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा राहिल्यास ते लोकसभा अधिवेशनात सहभागी होऊ शकतात; मात्र ते दिल्लीसाठी कधी रवाना होणार आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.