कुपोषणा संपणार कधी ?

महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे असे मानले जाते. प्रगत म्हणजे श्रीमंत राज्य. आता आपल्याला गरिबीची नवी व्याख्या ऐकल्यापासून एका गोष्टीची खात्री पटत चालली आहे की, देशाच्या किंवा एखाद्या राज्याच्या श्रीमंतीची निशाणी काय ? ज्या राज्यात गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात तेव्हा ते राज्य प्रगत झाले असे समजायला काही हरकत नाही. एका बाजूला अमाप श्रीमंती आणि दुसर्‍या बाजूला उदंड गरिबी दिसायला लागली की ते राज्य प्रगत झाले असे मानायला काही हरकत नाही. महाराष्ट्रात तर मायानगरी मुंबई आहे. देशातला एकुण आयकर जेवढा जमा होतो त्यातला ४० टक्के आयकर एकटया मुंबईतून जमा होतो पण त्याच मुंबईपासून अवघ्या शंभर मैलावर एवढे दागिदि्य नांदत आहे की जिथे लहान मुलांना जिवंत राहण्याइतके अन्न हक्क म्हणून तर दूरच पण उपकार म्हणूनही कोणी देत नाही. म्हणून तिथली अनेक बालके कुपोषणाला बळी पडत आहेत. ही अवस्था एका मोठ्या विसंगतीवर प्रकाश टाकणारी आहे. केवळ मुंबईच्या आसपासच नाही तर राज्याच्या अन्य भागातही मुले कुपोषणाला बळी पडत आहेत.

महाराष्ट्र जसे परदेशी गुुंंतवणुकीच्या बाबतीत आघाडीवर आहे तसेच ते कुपोषणाच्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या ग्रामीण भागात विशेषतः आदीवासी बहुल भागात कुपोषणाची स्थिती ङ्गार वाईट आहे. गेल्या महिन्यामध्ये या संबंधात विधानसभेत चर्चा झाली होती. महाराष्ट्रातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांपैकी दहा टक्के बालके अपेक्षेपेक्षा कमी वजनाची असल्याचे सांगण्यात आले होते. बालकांच्या कुपोषणाच्या बाबतीत ठाणे जिल्ह्याचे चित्र ङ्गार विदारक आहे. अशा प्रकारचे चित्र तसे एरवी लोकांसमोर येत नाही परंतु एखाद्या बालकाचा मृत्यू झाला की मात्र सगळीकडे बोभाटा होतो आणि त्याची भरपूर चर्चा होते. ठाणे जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील नांदगाव बंदरपाडा या गावात प्रिया किरकिरा या ९ महिन्याच्या बालिकेचा कुपोषणाने मृत्यू झाला. ही बातमी प्रसिध्द झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातल्या बालकांच्या कुपोषणाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आणि या जिल्ह्यातल्या कुपोषणाबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली. जव्हार आणि मोखाडा हे दोन तालुके अतिदुर्गम आहेत. त्यांंच्यापर्यंत आरोग्याच्या सोयी जाऊन पोहोचलेल्या नाहीत. न्य प्रगत भागांप्रमाणे तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि अंगणवाड्या यांच्य सोयी उपलब्ध नाहीत. त्यामुळे गरोदर मातांपर्यंत पोषण आहार जाऊन पोहचत नाही आणि जिथून तो प्राप्त करायचा असतो.

तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत. परिणामी शासन गरोदर मातांसाठी ज्या सोयी आणि सवलती जाहीर करते. त्या सोयीसवलती त्यांच्या पदरात पडत नाहीत. परिणामी या तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या ङ्गार मोठी आहे. तिथे करण्यात आलेल्या पाहणी नुसार या दोन तालुक्यात ६२५ बालके कुपोषित आहेत. ठाणे जिल्ह्याच्या बाकी तालुक्यांमध्ये आणि महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांमध्ये कुपोषणाची स्थिती यापेक्षा ङ्गार चांगली असेल असे काही संभवत नाही. कुपोषणाचे मुख्य कारण गरिबी हे आहे. असे सरसकट म्हटले जाते. परंतु ते काही सत्य नाही. अगदी जव्हार आणि मोखाडा या दोन तालुक्यांचा विचार केला तरी एक गोष्ट जाणवते की रस्ते, प्राथमिक आरोग्याच्या सोयी नसणे हीसुध्दा कुपोषणामागची मूलभूत कारणे आहेत. अजूनही कित्येक आदिवासींना अतीशय दुर्गम भागातून दहा-बारा किलोमीटर चालल्याशिवाय दवाखान्याचे दर्शन होत नाही. त्याचे परिणाम मुलांच्या प्रकृतीवर होणे अपरिहार्य असते. गेल्या कित्येक दिवसात आरडाओरडा होऊनसुध्दा बालकांच्या कुपोषणाच्या परिणामावर ङ्गार प्रभावी इलाज करण्यात आलेला नाही. कारण हा इलाज अनेक अंगांनी करावा लागणार आहे.

दुर्गम भागातील सडका, वाहतुकीच्या सोयी, शिक्षण आणि रोजगार निर्मिती त्याचबरोबर आरोग्याच्या सोयी अशा सगळ्या गोष्टी एकदाच हाती घेऊन कराव्या लागणार आहेत. आपण आदिवासींच्या कुपोषणाच्या संदर्भात विविध कारणांवर चर्चा करतो परंतु आदिवासी समाजात रूढ असलेल्या अनेक दुष्ट रूढीसुध्दा मुलांच्या कुपोषणाला कारणीभूत आहेत. या समाजात अजूनही अल्पवयीन मुलींचे विवाह केले जातात. शिक्षणाचा प्रसार नसल्यामुळे मुलगी वयात येताच तिच्यासमोर शिक्षण पूर्ण करण्याच्या ऐवजी विवाहाचे ध्येय असते. अशा लहान वयात विवाह आणि याच वयात मातृत्वाचे ओझे त्यांच्यावर टाकले गेले की त्यांच्या पोटी अशक्त मुले जन्माला येतात. मुळात या माताच स्वतः अशक्त असतात आणि त्यांना गरोदरपणात सकस आहार खायला मिळत नाही परिणामी त्यांची मुलेही कुपोषित राहतात. महिलांनी मुलांना अंगावर पाजावे म्हणजे मुलांची प्रकृती छान राहते असे कालच सार्‍या जगात सांगितले गेले आणि त्यासाठी जागतिक स्तनपान दिन पाळण्यात आला. मात्र याच दिवशी स्तनपानास तयार असणार्‍या परंतु अशक्तपणामुळे पुरेसे दूध मुलास पाजू न शकलेल्या मातांवर आपल्या मुलाचे हाल बघायला मिळत आहेत.