मतदारांनीही प्रलोभनांचा प्रतिकार करावा -डॉ. निला सत्यनारायण

पुणे, – निवडणुकीवर कोट्यवधी रुपयांचा होणारा खर्च आणि मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार टाळण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीबरोबरच नागरिकांचा प्रतिकारही आवश्यक आहे, अशी अपेक्षा राज्य निवडणूक आयुक्त डॉ. नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केली. मराठवाडा मित्र मंडळाच्या महाविद्यालयातर्फे राज्याचे माजी मु‘यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘स्पंदने युवकांची’ या विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी संस्थेचे सचिव भाऊसाहेब जाधव उपस्थित होते.

देशाला महासत्ता बनवायचे असेल, तर देशाचे नेतृत्व करणारी माणसेही चारित्र्यवान असायला हवी, असे सांगून सत्यनारायण म्हणाल्या, आज समाजातील वातावरण दूषित झालेले आहे. अशा परिस्थितीत भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेण्यापेक्षा नियमांना करुणेची जोड दिली तर प्रशासनाचा रूक्ष चेहरा बदलता येईल. तसेच युवकांनी मोठ्या सं‘येने प्रशासकीय सेवेत येणे आवश्यक आहे. ‘राईट टू रिजेक्ट‘चा पर्याय आजही आपल्या निवडणूक मशीनमध्ये उपलब्ध आहे. राईट टू रिजेक्टला जास्त मते मिळाली तर विजयी उमेदवार हे विजयी म्हणून घोषित करता येत नाही. त्यापेक्षा मतदारांनीच आपली परिपक्वता दाखविली पाहिजे. तसेच पूर्वी महाविद्यालयात होणार्‍या निवडणुका या तरुणांच्या नेतृत्व गुणांना वाव मिळण्यासाठी असायच्या. मात्र, त्यामध्ये राजकारण आले आणि त्याला वेगळे स्वरुप आले. आता पुन्हा महाविद्यालयात निवडणुका होणार असतील, तर त्याचे स्वागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सततच्या होणार्‍या पोटनिवडणुका या दुर्देवी आहेत. काही उमेदवार खोटी प्रमाणपत्रे दाखवून निवडून येतात. नियमानुसार ही प्रकरणे न्यायालयात जातात. अशा उमेदवारांचे अर्ज तिथल्या तिथे बाद करण्याची परवानगी निवडणूक आयुक्तांना दिली पाहिजे अथवा अशी प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविली पाहिजेत, असेही डॉ. नीला सत्यनारायण यांनी सांगितले.