मुंबई दि.२ – जुलै महिन्यात या वर्षात केवळ ४० टन सोन्याचीच आयात केली गेली असून गतवर्षी हेच प्रमाण ६५ टन इतके होते. एप्रिल मे या दोन महिन्यात विक्रमी ३०५ टन सोन्याची आवक भारतात झाली होती. मात्र सोने आयातीसाठी खर्ची पडत असलेल्या परकीय चलनामुळे चालू आर्थिक खात्यातील तूट वाढत चालल्याचे सांगत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने सोने आयातीबाबत अनेक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधाचे परिणाम आता दिसू लागल्याचे जाणकारांचे मत आहे.
जुलैत आयात केलेले सोने हे महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यातच आयात केले गेले आहे. कारण २२ जुलैपासून रिझर्व्ह र्बंकेने कन्साइन्मेंट इंपोर्टबाबत नवी पॉलिसी लागू केली आहे. त्यामुळे सोने आयातदारांत अजून गोंधळाचे वातावरण आहे. आगामी काळ हा सणसमारंभाचा असल्याने सोन्याची मागणी वाढणार आहे मात्र आयात कमी झाल्याने देशात सोने टंचाई जाणवत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सराफांच्या म्हणण्यानुसार आत्ताच देशभरात सोने दागिने घडविणारे लक्षावधी कारागीर सोने पुरेसे मिळत नसल्याने बेकार झाले आहेत. सोने आयातीवरील निर्बंध असेच चालू राहिले तर देशात सोन्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण होऊन भाववाढ होईल असेही सांगितले जात आहे.