झिम्बाब्वेविरुद्धची चौथी वनडे ही भारताने जिंकली

बुलावायो- हरारे असो किंवा बुलावायो, भारताला विजय मिळवताना फार प्रयास पडत नसल्याचे पुन्हा एकदा दिसले. बुलावायोतील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबवर झालेली चौथी वनडे नऊ विकेट आणि 19.1 षटके राखून जिंकत कोहली आणि सहका-यांनी झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचा चौकारफ पूर्ण केला. गोलंदाजांचे सातत्य तसेच रोहित शर्मा आणि सुरेश रैनाला गवसलेला सूर हे भारताच्या आणखी एका सहज आणि मोठया विजयाचे वैशिष्टय ठरले.

यजमानांचे 145 धावांचे आव्हान फार मोठे नव्हते. बहरलेली फलंदाजी पाहता पाहुणे किती लवकर जिंकतात, याचीच उत्कंठा होती. चेतेश्वर पुजाराला (13) दणक्यात वनडे पदार्पण करता आले नसले तरी रोहित शर्मा आणि सुरेश रैनाला गवसलेला सूर भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरला. या जोडीने दुस-या विकेटसाठी
21.2 षटकांत 122 धावांची नाबाद भागीदारी करताना 30.5 षटकांत नऊ विकेट राखून भारताला सहज विजय मिळवून दिला.

पहिल्या तीन लढतीत रोहित (20, 1 आणि 14) आणि रैनाने (0, 4 आणि नाबाद 28) निराशा केली होती. भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतल्याने या दोघांना विश्रांती दिली जाईल, असे जाणकारांना वाटत होते. मात्र कर्णधार विराट कोहलीने दोघांवर विश्वास दाखवला. कोहलीने मोठे मन करताना अडखळणा-या रैनाला वनडाउनफला बढती दिली.

रोहित आणि रैनाने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना फॉर्म मिळवला. रोहितने 18वे आणि रैनाने 29वे अर्धशतक झळकावले. रोहितने 90 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद 64 धावा केल्या. रोहितच्या तुलनेत रैना थोडा वेगाने खेळला. त्याने 71 चेंडूंत सहा चौकारांसह नाबाद 65 धावा केल्या. फलकावर धावा कमी असल्याने तसेच भारताची फलंदाजी मजबूत असल्याने यजमानांच्या गोलंदाजांचे काहीच चालले नाही.

कर्णधार ब्रेंडन टेलरने सात गोलंदाज वापरले. त्यापैकी तेंडाइ चटारालाच विकेट मिळवता आली. सलग चौथ्या विजयासह भारताने मालिकेतील आघाडी 4-0 अशी
वाढवली. शेवटची आणि पाचवी वनडे शनिवारी (तीन ऑगस्ट) होईल. प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेला 42.4 षटकांत 144 धावांत रोखले. सलग दुस-या लढतीत त्यांना डावाची संपूर्ण षटके खेळून काढता आली नाहीत. यजमानांच्या चारच फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या गाठत आली.

सातव्या क्रमांकावरील इल्टन चिगुंबुराने (नाबाद 50) वनडेतील पहिले अर्धशतक झळकावताना सर्वाधिक योगदान दिले. भारताच्या अचूक मार्‍यामुळे 15.1 षटकांत अवघ्या 47 धावांत निम्मा संघ गारद होऊनही यजमानांच्या डावाची इतिश्री व्हायला 43वे षटक उजाडले. याचे श्रेय चिगुंबुरासह माल्कम वॉलरला (35) जाते. या जोडीने सहाव्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी करताना तब्बल 22 षटके किल्ला लढवला. त्यांच्यामुळे झिम्बाब्वेला दीडशेच्या घरात पोहोचता आले.

वॉलरने त्याच्या छोटेखानी खेळीत तीन चौकार आणि एक षटकार खेचला. तो परतल्यानंतर चिगुंबुराने एक बाजू लावून धरली. त्याच्या पहिल्यावहिल्या नाबाद र्धशतकात चार चौकारांचा समावेश आहे. चिगुंबुराने विकेट राखली तरी अन्य फलंदाजांनी निराशा केली. भारतातर्फे लेगस्पिनर अमित मिश्राने (25-3) सातत्य राखले. त्याला डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि नवोदित मोहित शर्माची (प्रत्येकी दोन विकेट) सुरेख साथ लाभली. मोहम्मद शामी आणि जयदेव उनाडकरनेही प्रत्येकी एक विकेट घेतली.

पहिले तीन सामने जिंकून मालिका खिशात घातलेल्या भारताने दोन बदल केले. सलामीवीर शिखर धवन आणि मध्यमगती आर. विनय कुमारला विश्रांती देताना चेतेश्वर पुजारा आणि मध्यमगती मोहित शर्माला संधी दिली. दोघांनीही वनडे पदार्पण केले. हरयाणाच्या 24 वर्षीय मोहितने सिंकदर रझाच्या रूपाने आंतरराष्ट्रीय विकेटचा श्रीगणेशा केला. वॉलरला बाद करत त्याने त्यात आणखी भर घातली.त्यानेच पदार्पणात सामनावीराचा पुरस्कार मिळवला.