औरंगाबाद – गोदावरीच्या वरच्या भागातील धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे पैठण येथील जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झालेली आहे. जायकवाडी धरणात सुमारे चार टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांतून आणखी पाणी सोडण्यात येणार
असल्यामुळे येत्या काही दिवसांत या पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार आहे.
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढण्यास सुरुवात
जायकवाडी धरणाच्या वरील बाजूला नाशिक व नगर जिल्ह्यांत असलेल्या आठ धरणांत सरासरी जलसाठा पंचाहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. पैकी नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, कडवा आणि नांदूर मधमेेशर या चार धरणांतून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात आलेले असून त्यामुळे गोदावरी
नदी दुथडी भरून वाहत आहे. या पाण्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा चार टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
एकीकडे नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलेले असले तरी दुसरीकडे नगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे या धरणांतून मात्र अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. भंडारदरा धरणातून पाणी सोडून निळवंडे धरण भरून घेण्यात येत आहे. तथापि, नाशिक जिल्ह्याप्रमाणे नगर जिल्ह्यातील या धरणातून अजून तरी जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलेले नाही.
