बासमतीचा सुवास यंदा रशियातही दरवळणार

नवी दिल्ली दि.३१ – या वर्षात प्रथमच भारतीय बासमती तांदूळ रशियाला निर्यात केला जाणार असल्याचे वृत्त आहे. यंदा बासमती उत्पादक राज्ये असलेल्या पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेशात बासमती खालचे क्षेत्रही लक्षणीय रित्या वाढले आहे आणि यंदा पीकही उत्तम स्थितीत आहे. त्यातून डॉलरचे भाव वाढल्याने शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. शिवाय केंद्र सरकारने फेब्रुवारीत बासमती वरील निर्यात बंदी उठविली आहे. त्यामुळे शेतकरी रशियाला निर्यात करू शकणार आहेत आणि त्यासाठी प्रयत्नशीलही आहेत.

इराण देशातही भारतीय बासमती लोकप्रिय आहे. दरवर्षी तेथे बासमती निर्यात केला जातोच. यंदा ते प्रमाणही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा उत्पादनात १० टक्के वाढ अपेक्षित आहेच तसेच सुमारे २० लाख हेक्टर क्षेत्रावर यंदा बासमतीचे उत्पादन घेतले गेले आहे. सध्या बाजारात बासमतीचे दर साडेनऊ हजार रूपये क्विटलवर असून ते लवकरच १० हजार रूपयांवर जातील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

२०१२-१३ मध्ये ३४६ लाख टन बासमती निर्यात केला गेला होता तो यंदाच्या वर्षात ४०० टनांवर जाईल असे सांगितले जात आहे. येत्या तीन चार महिन्यात नवीन बासमती येत आहे तो पर्यंत ही निर्यात सुरूच राहिल असे समजते.