गुन्हेगारी खटले असलेल्या लोकप्रतिनिधींत शिवसेनेची आघाडी

मुंबई – दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांतील आरोपींना निवडणूकीची उमेदवारी दिली जाऊ नये अशा सूचना सर्वाच्च न्यायालयाने नुकत्याच दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नॅशनल इलेक्शन वॉच तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. २००४ ते २०१३ या कालावधीतील हे सर्वेक्षण असून त्यानुसार सर्वाधिक गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या लोकप्रतिनिधीत शिवसेना आघाडीवर आहे. शिवसेनेच्या आमदार व खासदारांची संख्या १३७ आहे व त्यातील १०३ जणांवर असे गुन्हे दाखल आहेत. म्हणजे हे प्रमाण ७५ टक्के इतके आहे.

सर्वच राजकीय पक्षांत असे खटले दाखल असलेले आमदार खासदार आहेत. शिवसेनेपाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या राजदचा नंबर असून त्यांच्या १२५ आमदार खासदारांपैकी ५८ जणांवर खटले आहेत. जदयू च्या २७० पैकी १२० जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी खटले आहेत. देशातील सर्वात मोठे पक्ष असलेल्या काँग्रेस व भाजपमध्ये हे प्रमाण अनुक्रमे २४५१ आमदार खासदारांपैकी ३२० जणांवर तर भाजपच्या १६८९ आमदार खासदारापैकी ५२० जणांवर खटले दाखल आहेत.