पंतप्रधान मोदींवर टीका केलेल्याला चेन्नईमधून उत्तर प्रदेश पोलिसांनी केली अटक


नवी दिल्ली – चेन्नईतील एका ६२ वर्षीय व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला मनमोहन मिश्रा नावाचा व्यक्ती मुळचा उत्तर प्रदेशमधील असून आपल्या कुटुंबासह तो ३५ वर्षांपूर्वी चेन्नईतील माधवराम येथे स्थायिक झाला होता.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड काढून देण्यासाठी एजंट म्हणून मनमोहन मिश्रा हा काम करतो. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असून अनेकदा युट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे व्हिडिओ पोस्ट करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली. तो व्हिडिओत हिंदी बोलत असल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. तसेच तो स्वतःही त्याच्या सरकारविरोधी भूमिकेमुळे आणि बोलण्यामुळे लोकप्रिय झाला आहे.

दरम्यान, त्याच्या व्हिडिओवर उत्तर प्रदेशमधील काही जणांनी आक्षेप घेत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. कोतवाली पोलिसांनी मनमोहनविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला, असता तो चेन्नईतील माधवराममध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी युपी पोलिसांचे एक पथक चेन्नईत पोहोचले आणि त्याला अटक केली. त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असून त्याच्याविरोधात ट्रांझिट वॉरंट काढण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला रेल्वेने उत्तर प्रदेशला नेण्यात आले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर त्याचे नुकतेच आलेले व्हिडिओ उपलब्ध नाहीत. पण सहा महिन्यांपूर्वीच्या एका जुन्या व्हिडिओत तो मोदींवर टीका करताना दिसत आहे. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मोदींनी देशातील जनतेसाठी पुरेसे काम केलेले नसल्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्याने या व्हिडिओत केली आहे.