
दुबई – भारतात होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा कोरोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आली आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि यूएईत खेळली जाणार आहे. यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. या स्पर्धेसाठी १५ खेळाडू आणि ८ अधिकाऱ्यांना आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच खेळाडू आणि अधिकाऱ्यांची यादी १० सप्टेंबरपर्यंत देण्यास सांगितले आहे.
आयसीसीची सहभागी देशांना टी-20 विश्वचषक स्पर्धेतील खेळाडूंची यादी पाठवण्याची सूचना
कोरोना आणि बायो बबलची स्थिती पाहता आयसीसीने टी-२० स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना अतिरिक्त खेळाडू आणण्याची परवानगी दिली आहे. पण त्याचा खर्च संबंधित क्रिकेट मंडळाला करावा लागणार आहे. आयसीसी फक्त १५ खेळाडू आणि ८ अधिकाऱ्यांचा खर्च उचलणार आहे, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीचे पात्रता फेरीचे सामने २३ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत. या पात्रता फेरीत श्रीलंका, आयर्लंड आणि बांगलादेश हे संघ सहभागी होणार आहे. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या पात्रता फेरीतून चार संघ सुपर-१२ साठी पात्र ठरणार आहेत.
