पाकिस्तानात तुरूंगावर तालिबानी हल्ला – ३०० कैदी पळविले

इस्लामाबाद दि.३० – पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम भागातील डेरा इस्माईलखान शहरातील मध्यवर्ती तुरूंगावर सोमवारी रात्री सशस्त्र तालिबानी अतिरेक्यांनी ग्रेनेड, मशिनगन्स व रॉकेटच्या सहाय्याने हल्ला चढवून तेथे असलेल्या तालिबानी तसेच बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांचे ३०० हून अधिक कैदी मुक्त केले असल्याचे समजते. पोलिस वेशात तुरूंगात घुसलेल्या या अतिरेक्यांनी सुरवातीला घडविलेल्या स्फोटात तुरूंगाची बाहेरची संरक्षक भिंत फोडली आणि तुरूंगात प्रवेश केला. गोळीबार करतच हे अतिरेकी कैद्यांच्या कोठड्यांकडे गेले आणि त्यांनी कैद्यांना मुक्त केले. यावेळी तुरूंग विभागाच्या मदतीला तातडीने आलेल्या पाकिस्तानी लष्कराबरोबर या अतिरेकयांची चकमक उडली. मंगळवार पहाटेपर्यंत या परिसरातून गोळीबारचे आवाज ऐकू येत होते.

या हल्याची जबाबदारी तेहरीक ए तालिबान संघटनेने स्वीकारली आहे. संघटनेचा प्रवक्ता शाहिदुल्ला शाहीद याच्या म्हणण्याप्रमाणे १०० सशस्त्र तालिबानी आणि सात आत्मघातकी बॉम्बर यांनी हा हल्ला केला. तुरूंगात घुसल्यावर जवळ असलेल्या लाऊड स्पीकरवरून कैदेतील तालिबानी अतिरेक्यांची नांवे पुकारली जात होती. या तुरूंगात ५ हजार कैदी असून त्यातील २५० तालिबानी तर लष्कर ए जांगवी या बंदी असलेल्या संघटनेनेचे अनेक सदस्य आहेत. त्या सर्वांची सुटका करण्यात आल्याचे शाहीद याचे म्हणणे आहे.

गेल्या एप्रिलमध्येही अफगाण सीमेवर असलेल्या बनू जेल वर याच प्रकारे हल्ला करून ४०० दहशतवाद्याची मुक्तता केली गेली होती.