चोरट्यांनी पळविले ५३० लाख डॉलर्सचे जवाहिर

कान्स दि.२९ – कान्स येथील कार्लटन इंटर कॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये भरविण्यात आलेल्या हिरे जवाहिराच्या प्रदर्शनातून चोरट्याने चक्क ५ कोटी ३० लाख डॉलर्स किमतीचे हिरे आणि दागिने कांही क्षणात लंपास केल्याचे वृत्त आहे. कान्स येथे नुकत्याच पार पडलेल्या कान्स चित्रपट महोत्सवादरम्यानही चोरट्यांची दोन वेळा चोर्याॉ करून असेच दागिने पळविल्याची घटना ताजी असतानाच ही मोठी चोरी पुन्हा झाली आहे. युरोपमधील चोर्‍यांच्या इतिहासात ही सर्वात मोठी चोरी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हॉटेलबाहेर पोलिसांचा कडक पहारा असतानाही ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चोरीस गेलेले दागिने लेव्ह लेव्हीट डायमंड हाऊस या कंपनीचे असून ही कंपनी इस्त्रायलमधील प्रसिद्ध अब्जाधीश लेव्हे लेव्हिट यांच्या मालकीची आहे. कार्लटन हॉटेलमध्ये उन्हाळ्याच्या सीझन निमित्ताने या दागिन्यांचे प्रदर्शन भरविले गेले होते. कारण उन्हाळ्यात कान्स येथे अनेक अतिश्रीमंत आणि प्रसिद्ध व्यतक्ती सुटीसाठी येत असतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सकाळी अॅटोमॅटिक पिस्तुल घेतलेल्या एका व्यकतीने या प्रदर्शनात प्रवेश केला. त्याने चेहरा झाकून घेतला होता व हातमोजे घातले होते. कुणाच्या कांही लक्षात येण्याअगोदरच त्याने अतिशय वेगाने हालचाली करून दागिने गोळा केले आणि पलायन केले. या दागिन्यांत हिरे जडविलेल्या घड्याळांचाही समावेश असून अजून नक्की किती रकमेचे दागिने चोरले गेले याचा हिशोब केला गेलेला नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार किमान ५३० लाख डॉलर्सच्या दागिन्यांवर या चोरट्याने डल्ला मारला आहे.