नवी दिल्ली – आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे राज्य निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरीही या निर्णयाशी आपला काही संबंध नाही. आपल्याला हे विभाजन मान्य नाही असे आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी पक्षश्रेष्ठींना बजावले असल्याचे वृत्त आहे. कोणत्याही प्रकारच्या विघातक निर्णयात आपण सहभागी नाही असेही त्यांनी पक्षाचे आंध्र प्रदेशातील प्रभारी दिग्विजयसिंग यांना सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनीच तेलंगणाबाबत हात झाडले
पक्षश्रेष्ठींनी तेलंगण निर्मितीचा निर्णय घेतला असल्याचे जेव्हा रेड्डी यांना सांगण्यात आले तेव्हा त्यांनी सध्या सुरू असलेल्या पंचायत निवडणुका होईपर्यंत विभाजनाचा निर्णय जाहीर करू नये असे पक्षश्रेष्ठींना आवाहन केले. परंतु पक्षश्रेष्ठी त्यास सहमत झाले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री चिडले आणि ते घुश्श्यातच हैदराबादला परतले आणि त्यांनी आमदारांची बैठक बोलावून त्यांच्यापुढे आपले मन मोकळे केले.
आंध्र प्रदेशात ३१ जुलै रोजी पंचायत निवडणुका पूर्ण होत आहेत. परंतु नगरपालिकांच्या निवडणुका १५ सप्टेंबरला होणार आहेत. त्या निवडणुका होईपर्यंत तेलंगण निर्मितीचा निर्णय जाहीर करू नये अशी त्यांची विनंती होती. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांची विनंती धुडकावून लावली. त्यामुळे ते चिडले आहेत.
