पाकिस्तानी सैन्याचा जोरदार गोळीबार

जम्मू – भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवरील पूंछ भागातील एका भारतीय चौकीवर शनिवारी पाकिस्तानी सैनिकांनी जोरदार गोळीबार केला. या हल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या हल्ल्यासाठी दूरवरून ङ्गेकता येणार्‍या रॉकेट प्रोजेक्टाईल ग्रेनेडस्चा वापर केला. म्हणजे हे एक प्रकारचे हातबॉम्ब आहेत, पण ते रॉकेटच्या साह्याने दूरवर नेऊन ङ्गेकता येतात. शनिवारी सकाळी साडे सात वाजता पूंछ भागातील शहापूर चौकीच्या जवळ हा हल्ला झाला. मात्र भारतीय सैनिकांनी त्याला चोख उत्तर दिले. त्यामुळे सुमारे पाच तास चकमक झडत राहिली.

या हल्ल्याला डोडा बटालियन या सैनिकांच्या तुकडीने चोख उत्तर दिले आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी या परिसरातल्या अन्यही चौक्यांवर टेहळणी अधिक कडक करण्याचा आदेश दिला. या भागातल्या शहापूर केरनी या गावात नागरी वस्ती आहे. या गोळीबारामुळे या वस्तीतल्या नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली.

पाकिस्तानी सैनिकांकडून भारताच्या हद्दीत जुलै महिन्यात झालेला हा पाचवा हल्ला आहे. यापूर्वी ३ जुलैला पूंछ भागातील सब्जीयान खेड्याजवळ असा हल्ला झाला होता. त्यात एक दहशतवादी मारला गेला. ८, १२ आणि २२ जुलै असे तीन दिवस अशाच प्रकारचे हल्ले झाले होते.