स्नोडेनला मृत्युदंड नाही – अमेरिकेचे रशियाला वचन

मास्को दि.२७ – अमेरिकी गुप्तचर यंत्रणांची महत्त्वाची राष्ट्रीय गुपिते फोडून हाँगकाँग येथून मास्कोला गेलेल्या एडवर्ड स्नोडेन याला अमेरिकेत परत पाठविले जावे, त्याचा छळ केला जाणार नाही अथवा त्याला मृत्युदंडही दिला जाणार नाही असे अधिकृत वचन अमेरिकेने रशियाला दिले असल्याचे समजते. क्रेमलिन प्रवक्ते दिमित्री पेस्कॉव्ह यांनी या संदर्भात अमेरिकन सुरक्षा यंत्रणा एफबीआय आणि रशियन सुरक्षा यंत्रणा एफएसबी यांच्याच चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे.

पेस्कॉव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार यूएस अॅटर्नी जनरल एरिक होल्डर यांनी लिहिलेल्या पत्रात स्नोडेनचा अपराध गंभीर असल्यामुळे त्याला अमेरिकेत परत पाठविले जावे मात्र त्याचा छळ होणार नाही अथवा त्याला मृत्यूदंडही दिला जाणार नाही असे कळविले आहे. स्नोडेनच्या हस्तांतरणास रशियाने यापूर्वीच नकार दिला आहे. रशियाचे अध्यक्ष व माजी केजीबी हेर पुतीन यांनी तर कोणालाच रशिया कधीच हस्तांतरण करून परत पाठविणार नसल्याचे मत व्यक्त केले होते.

रशियाने स्नोडेनला ताप्तुरता आश्रय देण्याची तयारी दाखविल्याचे यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. हा आश्रय सहा महिन्यांसाठीही असू शकतो असे सांगितले जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते रशिया स्नोडेनला परत पाठविणार नाही याची अमेरिकेला खात्री आहेच. त्यामुळेच यापुढे निदान त्याने अमेरिकेची आणखी कांही गुपिते तरी फोडू नये याची काळजी रशियाने घ्यावी अशी विनंतीही केली गेली आहे.