फोर्ब्जच्या अब्जाधीशांच्या यादीत बर्नार्ड अॅरनॉल्ट यांनी पटकवला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान


नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रॅन्ड लुईस विटनचा मालक बर्नार्ड अॅरनॉल्ट यांनी पटकावला आहे. रियल टाईम बिलिनियर्स लिस्ट फोर्ब्जने जाहीर केली असून बर्नार्ड अॅरनॉल्ट यांनी त्यामध्ये अॅमेझॉनच्या जेफ बेझोस आणि टेस्लाच्या एलन मस्क यांना मागे टाकत हे स्थान पटकावले आहे.

फ्रान्सच्या LVMH या उद्योग समूहाचे संस्थापक असलेल्या बर्नार्ड अॅरनॉल्टची संपत्ती आता 198.9 अब्ज डॉलर्स एवढी असून जेफ बेझोस या यादीत 194.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर एलन मस्क यांचा नंबर लागत असून त्याची संपत्ती ही 185.5 अब्ज डॉलर्स एवढी आहे. गेल्या आठवड्यात अमेझॉनच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची घट झाली. जेफ बेझोस यांनी एकाच दिवसात जवळपास 14 अब्ज डॉलरची संपत्ती गमावली होती. त्याचा फायदा बर्नार्ड अॅरनॉल्ट यांना झाला असून ते थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचले.

1984 साली लग्जरी गुड्स मार्केटमध्ये बर्नार्ड अॅरनॉल्ट यांनी पाऊल टाकले होते. कोरोनाच्या काळात बर्नार्ड अॅरनॉल्ट यांच्या लुईस विटन या लग्जरी ब्रॅन्डचा खप मोठ्या प्रमाणात झाला आहे. या काळात बर्नार्ड अॅरनॉल्ट यांच्या कंपनीचा महसूल हा 17.4 अब्ज डॉलर्सनी वाढला. कोरोनाच्या पूर्व काळाशी तुलना करता ही वाढ 14 टक्क्याहून अधिक आहे.