नवी दिल्ली – तेलंगण निर्मितीच्या संबंधातील चर्चा आता संपल्या असून कॉंग्रेसपक्षाच्या सर्वोच्च अधिकारी समितीने या संबंधात काही निर्णय घेतलेला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी म्हणजे ५ ऑगस्टपूर्वी हा निर्णय घोषित केला जाईल असे पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी काल पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. आंध्रप्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे स्वतंत्र राज्य करावे अशा निष्कर्षाप्रत पक्ष आला आहे. त्यामुळे ५ ऑगस्टपूर्वी होणारी घोषणा ही तेलंगण निर्मितीची घोषणा असेल असे सूचित केले जात आहे.
तेलंगणाची घोषणा ५ ऑगस्टपूर्वी
पक्षाची सर्वोच्च यंत्रणा राज्याच्या विभाजनाच्या निष्कर्षाप्रत आली असली तरी आंध्रप्रदेशातील कॉंग्रेसचे नेते मात्र राज्याच्या विभाजनास अनुकूल नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनीच विभाजनास विरोध केला असून तेलंगणाची निर्मिती करणे ही कॉंग्रेस पक्षासाठी आत्महत्यास ठरेल असे म्हटले आहे. पक्षाच्या गाभा समितीची या संबंधात बैठक झाली तिच्या पूर्वी मुख्यमंत्री रेड्डी यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना आपले हे मत कळवले असल्याचे वृत्त आहे.
किरणकुमार रेड्डी यांची सोनिया गांधी यांच्याशी बैठक होण्याच्या आधी तेलंगण वगळता उर्वरित आंध्र प्रदेशातील कॉंग्रेसच्या आमदारांची बैठक होऊन या बैठकीत तेलंगण निर्मितीला विरोध करण्यात आला होता आणि आपली ही विरोधाची भावना मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी सोनिया गांधी यांना कळवावी असे त्यांना आवाहन करण्यात आले होते. पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंग हे आंध्राचे प्रभारी आहेत. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दामोदर राज नरसिंहा आणि प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बोत्सा सत्यनारायण यांची भेट घेऊन चर्चा केली होती. राज्याचे विभाजन करण्याची घोषणा होण्याचे संकेत मिळताच हे तीनही नेते तातडीने दिल्लीला आले होते. आंध्र प्रदेशातून लोकसभेवर ४२ सदस्य निवडून दिले जातात. त्यामुळे या राज्यातल्या राजकारणाला महत्त्व आहे.
