
मुंबई : 45 लाख रूपये मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी आरोपींच्या खात्यात जमा करण्यात आले होते. पण हे पैसे कोणी दिले होते?, याचा तपास अद्याप बाकी असल्यामुळे याप्रकरणी आरोरपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात करण्यात आली. एनआयएने न्यायालयाकडे आणखीन 30 दिवसांची मुदत देण्याची मागणी केली आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरण; आरोपींच्या खात्यात टाकले 45 लाख रूपये, न्यायालयात एनआयएची माहिती
यापूर्वी तपास यंत्रणेला 9 जून रोजी आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयाने 2 महिन्यांची मुदतवाढ दिली होती. याप्रकरणी एपीआय सचिन वाझे, एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मासह अन्य काही पोलीस अधिकारी आणि इतरांना एनआयएने अटक केली आहे.
जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या दक्षिण मुंबईतील निवासस्थानाबाहेर सोडण्यात आली. त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याच्या अचानक मृत्यूनंतर हे प्रकरण खूप गाजले. त्यानंतर याप्रकरणाची सारी सुत्र एनआयएने आपल्या हाती घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तचर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली होती. त्यानंतर या तपासात नवनवी माहिती समोर येत गेली आणि एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत गेले. या प्रकरणात अटक करण्यात आलेली सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
