मेलबर्न दि.२६ – ऑस्ट्रेलियात नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या निवडणुकात विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे उतरत असून त्याने निवडणुकांसाठी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाच्या सात उमेदवारात दोन भारतीय वंशाचे उमेदवार असल्याचे समजते. द विकिलिक्स पार्टी असे या नव्या राजकीय पक्षाचे नामकरण करण्यात आले आहे.
या निवडणुकात असांजेही उमेदवार असणार आहे मात्र तो मूळचा ऑस्ट्रेलियाचाच नागरिक आहे. अन्य सहा उमेदवारांत विनय कॅम्पमाळी व सुरेश राजन या दोन भारतीय वंशाच्या उमेदवारांचा समावेश आहे. पैकी विनय याचा जन्म मलेशियात झाला असून तो बंगालशी संबंधित आहे तर सुरेश केरळ राज्याशी संबंधित आहे. या निवडणकांत शरणार्थींच्या प्रश्नावरून सत्तारूढ लेबर पार्टीची नीती हा महत्त्वाचा प्रचाराचा मुद्दा असेल असे असांजेने जाहीर केले आहे.
४२ वर्षीय असांजे अमेरिकेची महत्त्वाची गुप्त कागदपत्रे विकिलिक्सच्या माध्यमातून फोडल्याप्रकरणी अमेरिकेला हवा आहे मात्र गेल्या जून २०१२ पासून त्याने ब्रिटनमधून स्वीडनला हस्तांतरण रोखले जावे यासाठी लंडन येथील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला आहे. त्याला इक्वेडोरने राजाश्रय दिला आहे मात्र वर्षभरात तो या दूतावासातून बाहेर पडू शकलेला नाही.