सुट्ट्या नाण्यांच्या टंचाईने पुणेकर हैराण

पुणे दि.२५- पुण्यात वाढत्या महागाईचा चटका सोसून हैराण झालेल्या नागरिकांना आता सुट्ट्या नाण्यांच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईमुळे दैनंदिन व्यवहारातही अनेक अडचणींचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. गेले कांही महिने नाण्यांची टंचाई जाणवत होतीच मात्र आता त्याने अधिक तीव्र स्वरूप धारण केले आहे.

बस प्रवास, भाजीखरेदी, किराणा माल, किरकोळ सामान, दूध अशा नित्याच्या खरेदीच्या वेळी नागरिकांना नाण्यांची कमतरता अधिकच भासते आहे व त्यामुळे ८-९ रूपयांची खरेदी असली तरी १० रूपये मोजावे लागत आहेत. पानाच्या टपर्‍या, छोटी हॉटेले, चहाच्या टपर्‍यावरही सुट्या नाण्यांमुळे दुकानदार आणि ग्राहक दोघेही अडचणीत येत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात कांही व्यापारी नोटांऐवजी नाणी देण्याचा व्यवसाय करतात मात्र आता येथेही नाण्यांचे दर वाढले असून १०० रूपयांची नाणी मागितली तर १०० रूपये घेऊन ८० रूपयांचीच नाणी दिली जात असल्याचे छोट्या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. लहान दुकाने व तत्सम किरकोळ विक्री करणार्‍याना दररोजच सुटी नाणी मोठ्या प्रमाणात लागतात. बसमध्ये कंडक्टर आणि प्रवासी यांच्यातही नाण्यांच्या अभावामुळे खडाजंगी रोजच अनुभवास येत आहे असे त्रस्त नागरिकांचे म्हणणे आहे.

पुण्यातील विविध भागातील देवळांसमोर बसणारे भिकारी, डोंबारी यांच्याकडूनही सुटी नाणी मिळू शकतात मात्र नाण्यांच्या टंचाईची जाणीव या लोकांनाही झाली असल्याने तेही १० रूपयांची नाणी मागितली तर आठच रूपये हातावर ठेवतात असा अनुभव येत आहे.