राज्यभर पावसामुळे महामार्ग वाहतूक मंदावली

पुणे, दि. 24 -एका बाजूला राज्यातील प्रत्येक शहरात खड्ड्यांचे साम्राज्य तर आहेतच पण सर्व महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग येथेही खड्ड्यामुळे वाहतून अडचणीची झाली आहे. राज्यात सर्वदूर सुरू असलेला पाऊस, राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, घाटात ठिकठिकाणी कोसळणार्‍या दरडी आणि पर्यटकांची गर्दी यामुळे ‘एस.टी.’ (राज्य परिवहन महामंडळ) आणि ‘रेल्वे’ सेवा विस्कळीत झाली. महामार्गावर वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे मुंबई, सातारा, सोलापूर, नाशिक, अहमदनगर आणि कोकणातून पुण्यात येणार्‍या व त्याच प्रमाणे पुण्याहून सुटणार्‍या गाड्या एक ते दीड तास उशिरा पोहोचत आहेत. रेल्वेसेवाही संथ गतीने सुरू आहे.

मागील आठ दिवसांपासून शहरासह राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबई, सातारा आणि कोकणात जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. खंडाळा आणि ताम्हीणी घाटात दरडी कोसळत असल्यामुळे लोणावळा, खंडाळा, पनवेल, ताम्हीणी या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी वाहनांचा तासन्तास वेळ जातो. सातारा रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कात्रज, खेड-शिवापूर, कापूरहोळ या ठिकाणी मोठ खड्डे पडले आहेत. अशीच अवस्था सोलापूर, नाशिक, अहमदनगर महामार्गांची असून, स्टँडमधून वेळेत सुटणार्‍या एस.टी.ला वाहतूक कोंडी आणि खड्डयांमुळे दुसर्‍या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ते दीड तास उशीर होत आहे.

याबाबत स्वारगेटचे वरिष्ठ आगार प्रमुख विजय दिवटे म्हणाले, पुणे-मुंबई रस्त्यावरील गाड्यांना अधिक उशीर होत आहे. या गाड्या एक ते दीड तास उशिरा येत असल्याने काही फेर्‍या रद्द करून, एकच गाडी सोडली जाते. पावसामुळे प्रवाशांची संख्याही कमी आहे. त्यामुळे गाड्या उशिरा येत असल्या तरी, प्रवाशांची कोणतीही गैरसोय होत नाही. मुंबई येथे मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळावर पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईसह अन्य ठिकाणाहून येणार्‍या एक्स्प्रेस रेल्वेगाड्या पुण्यात उशिरा येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना गाडीची वाट पहावी लागत आहे. लोकल रेल्वेचीही वाहतूक संथ गतीने सुरू असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.

चांदणी चौक ते कात्रजपर्यंत वाहतूक कोंडी
कात्रज-देहू बाह्यवळण मार्गावर चांदणी चौक, बावधन, डुक्कर खिंड, धायरी आणि कात्रज या ठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे आणि रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती. बावधन येथे पुलाचे काम सुरू आहे तर डुक्कर खिंड येथे रस्त्याच्या कामामुळे वाहनांना पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे; मात्र, या रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्यामुळे आज (दि. 24) सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे वाहने रस्त्यातच बंद पडत असल्यामुळे कोंडीत आणखी भर पडत होती. त्यामुळे चांदणी चौक ते वारजे आणि धायरी ते कात्रजपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करीत होते.