सरकारी अधिकाऱ्यांना झापणाऱ्या नारायण राणेंवर अजित पवारांची नामोल्लेख न करता टीका


मुंबई – रत्नागिरीतील चिपळूण येथे मुसळधार पावसामुळे पुराने थैमान घातल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनीही चिपळूणचा दौरा करत परिस्थितीची पाहणी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत पोहोचले होते. दरम्यान एकही अधिकारी यावेळी उपस्थित नसल्यामुळे नारायण राणे यांचा पारा चढला आणि त्यांनी सर्वांसमोर आधी फोनवर आणि नंतर समोरासमोर अधिकाऱ्यांना झापले. यावर नारायण राणेंचे नाव न घेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणाचेही नाव मी घेतलेले नाही. प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे. पण आपल्यासोबत अधिकारी असले पाहिजेत अशी अपेक्षा करु नये, असेही ते म्हणाले आहेत.

अधिकाऱ्यांना सुनावण्यासंबंधी तसेच फडणवीसांनी अधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या, असा नारायण राणे यांनी आरोप करण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, आरोप करणाऱ्यांना उत्तर देण्यास मी मोकळा नाही. जेव्हा एखाद्या ठिकाणी जाता, तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी, इतर काम करणारी टीम मुख्यमंत्र्यांकडेच गेली पाहिजे. कोणीही मुख्यमत्री असले तरी असेच होणार. अशा संकटाच्या काळात पक्षीय वाद, मतभेदमध्ये आणायचे नसतात. आम्हीदेखील पाच वर्ष सरकारमध्ये नव्हतो. त्यावेळीही संकंट आली की जायचो. आम्ही कधीही जिल्हाधिकारी, प्रांतिधिकारी कुठे आहेत, अशी विचारणा केली नाही. अरे तुम्ही त्यांना पहायला आला आहात की पाहणी करण्यासाठी आला आहात. तुम्हाला सांगायचे असेल तर पाहणी केल्यावरही सांगू शकता, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

शेतांची अवस्था पूर्ण पाणी कमी झाल्याशिवाय कळू शकत नाही. पाणी ओसरले आहे, तिथे पंचनामे सुरु आहेत. त्यानुसार मदत केली जाईल, असे सांगताना अजित पवारांनी विरोधकांसह सर्वांनी जिल्हाधिकारी, प्रांत, मामलेदारांना आपली काम करु द्यावी, असे आवाहन केले. वेगवेगळ्या व्यक्तींना पाहणी करण्याचा अधिकार आहे. त्यांच्यासोबत आम्ही नोडल अधिकारी नेमले असून ते माहिती देतील. व्हीआयपी गेले तर त्यांच्या मागे सगळे फिरत राहतात आणि कामावर परिणाम होतो, असे अजित पवारांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना काही लोकांनी अरे तुरे शब्द वापरले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अनेक मोठे व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्री झाले. यांच्या काळात कधीही कोणीही, विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अनुद्दार काढले नसल्याचे सांगत अजित पवारांनी विरोधकांना सुनावले. टास्क फोर्सची बैठक होईल आणि जिल्ह्यांची संख्या हाती येईल त्यानंतर निर्बँध शिथिल करण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल. कॅबिनेटमध्ये चर्चा झाली असून त्यांनी तज्ज्ञांशी बोलून जिथे कोरोना कमी झाला आहे, तिथे योग्य विचार करुन निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली.