वॉशिग्टन दि.२२ – कर्णबधिर अथवा ज्यांना कमी ऐकू येते अशा लोकांसाठी संगणकाच्या माध्यमातूनही संवाद साधणे आता शक्य होणार आहे. कर्णबधिरांशी संवाद साधण्यासाठी वापरली जाणारी साईन लँग्वेज टेक्स्ट मध्ये रूपांतरीत करू शकणारी संगणक प्रणाली चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस च्या कॉम्प्युटर तंत्रज्ञान विभागातील संशोधकांनी तयार केली आहे. ही प्रणाली मायक्रोसॉफ्टसाठी तयार केली गेली असून तिचे नामकरण किनेक्ट डिव्हाईस असे करण्यात आले आहे. सध्या ही प्रणाली अमेरिकन साईन लँग्वेजसाठी वापरता येत असली तरी लवकरच ती जगातील कोणत्याही भाषेसाठीच्या साईन लँग्वेजसाठी वापरता येऊ शकणार आहे.
या तंत्रज्ञानानुसार संगणकाच्या की बोर्डवर शब्द अथवा वाक्य टाईप केले गेले तरी त्याचे रूपांतर साईन लँग्वेजमध्ये होते. तसेच साईन लँग्वेजच्या सहाय्याने संगणकासमोर कर्णबधिर व्यक्तीने अथवा साईन लॅग्वेज येणार्या व्यक्तीने खुणा केल्या तरी ते शब्द अथवा वाक्यात रूपांतरीत होऊ शकते. हे तंत्रज्ञान दोन प्रकारे काम करते. पहिले ट्रान्सलेशन मोड म्हणजे हाताच्या बोटांच्या हालचाली टेक्स्ट किवा स्पीच मध्ये रूपांतरीत करते व दुसरे कम्युनिकेशन मोड म्हणजे साईन लँग्वेज किवा बोललेले शब्द टाईप केले तर दुसर्यारशी संवाद करणे शक्य होते.
हे तंत्रज्ञान कमी खर्चात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून लवकरच ते मोठ्या प्रमाणावर वापरात येईल असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत.