विकास हाच निवडणुकीचा मुद्दा – राजनाथसिंह

न्यूयॉर्क – लोकसभेच्या २०१४ साली होऊ घातलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसाठी राम जन्मभूमी नव्हे तर विकास हा निवडणुकीचा मुद्दा असेल, असे भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रतिपादन केले. राम जन्मभूमी हा राष्ट्रीय मुद्दा आहे तो निवडणुकीचा मुद्दा नव्हे असे राजनाथसिंह यांनी प्रतिपादन केले. या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असतील असेही त्यांनी सांगितले. मोदी हे तूर्तास तरी भाजपातले राष्ट्रीय अपील असलेले एकमेव उत्तुंग नेते आहेत, असे ते म्हणाले.

आपण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहोत. पक्षाचा अध्यक्ष हा सभेला गर्दी खेचणारा लोकप्रिय नेता असावा किंवा तो पंतप्रधानपदाचा उमेदवार असावा असा काही नियम नाही. पक्षाची संघटना बांधणे हे अध्यक्षांचे काम असते आणि आपण ते काम करत आहोत. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आपल्या नावाची चर्चाही होत नाही आणि आपण पंतप्रधान होण्यास उत्सुक नाही. संघटक म्हणून पक्ष बांधणी करणे आणि पक्षाला केंद्रात सत्तेवर आणणे हेच आपले काम आहे आणि ते आपण करत आहोत, असे त्यांनी प्रतिपादन केले.

श्री. राजनाथसिंह हे पाच दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर आले असून त्यांच्यासोबत खा. अनंतकुमार, विजय जोली आणि सुधांशू त्रिवेदी हे आहेत. वॉशिंग्टनमध्ये होणार्‍या दक्षिण आशियाच्या सुरक्षा विषयक परिषदेत सहभागी होण्यासाठी ते आलेले आहेत. या परिषदेच्या आधी ते पत्रकारांशी बोलत होते. भारतातल्या लोकांना कॉंग्रेसचे भ्रष्टाचारी सरकार नकोसे झाले आहे आणि भारतीय जनता पार्टीच भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ शकेल, असा जनतेला विश्‍वास वाटतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव होणार, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.