बीजिंग विमानतळावर स्फोट

बीजिंग – चीनची राजधानी बीजिंग येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल क्रमांक ३ वर शनिवारी बॉम्बस्फोट होऊन एक व्यक्ती जखमी झाली. प्राथमिक चौकशीत हा स्फोट त्या जखमी झालेल्या माणसानेच घडवला होता असे आढळले आहे. या स्फोटसाठी घरगुती बॉम्बचा वापर करण्यात आला असल्याचे चीनच्या झिनुहा या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. ही घटना प्रत्यक्ष पाहणार्‍या प्रवाशांनी एका अपंग व्यक्तीने हा स्फोट घडवला असावा, असा अंदाज व्यक्त केला.

या बॉम्ब स्फोटमुळे बीजिंग विमानतळावरच्या विमान वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले. मात्र यापेक्षा या स्फोटचा कोणताही मोठा परिणाम झाला नाही, असे सरकारतर्फे अधिकृतरित्या सांगण्यात आले. जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची चौकशी केली जात आहे. तिच्यातूनच या स्फोटमागचे सत्य कारण प्रकट होईल, असे वृत्त चीनमधील सरकारी मालकीच्या चायना सेंट्रल टेलिव्हिजन या वृत्तवाहिनीवरून देण्यात आले.

विमानतळावरील सुरक्षा अधिकार्‍यांना या स्फोटची पूर्वकल्पना नव्हती. मात्र ही अपंग व्यक्ती स्फोटके सोबत घेऊन विमानतळाच्या टर्मिनलपर्यंत कशी पोचू शकली याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. चीनमधील कोणत्याही सरकारी माहितीच्या बाबतीत कमालीची गुप्तता पाळली जाते. त्यामुळे या स्फोटची यापेक्षा अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.