
वॉशिंग्टन: आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरुन नेहमीच अमेरिकेतील अंतराळ संस्था नासा अंतराळातील विविध फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करत असते. नासाने नुकताच असाच एक फोटो शेअर केला आहे. 2016 मध्ये काढलेला हा फोटो चकित करणारा आहे. नासाने या फोटोमधून अंतराळातील एका मोठ्या बुडबुड्यात अडकलेला तारा दाखवला आहे.
आकाशगंगेतील बुडबुड्यात अडकलेल्या ताऱ्याचा फोटो नासाने केला शेअर
1990 मध्ये हबल स्पेस टेलीस्कोपची (Hubble Space Telescope) निर्मिती नासाने केली होती. या टेलीस्कोपने 1990 मध्ये लॉन्च झाल्यापासून अनेक सुंदर छायाचित्रे काढली. पण, मागच्या काही काळापासून कम्प्यूटर खराब झाल्यामुळे हा टेलीस्कोप बंद होता. पण, हा टेलीस्कोप आता पुन्हा सुरू झाला आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी नासाने (NASA) इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका मोठ्या बुडबुड्यात तारा अडकलेला दिसत आहे. हा फोटो पाहून लोकही चकित झाले आहेत.
नासाने हा फोटो शेअर करत लिहीले आहे की,कम्प्यूटर खराब झाल्यामुळे हबलने काही दिवसांपासून फोटो घेणे बंद केले होते. पण, आता ती खराबी दुर झाली असून हा टेलीस्कोप आता पूर्वीप्रमाणे काम करण्यास तयार आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही हबलने घेतलेला एक फोटो शेअर करत आहोत. नासाने या पोस्टमध्ये बुडबुड्यात अडकलेल्या ताऱ्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, या बबल नेबुलाच्या आत आपल्या सुर्यापेक्षा एक लाख पट अधिक चमकणारा तारा आहे. या ताऱ्याची गती चार मिलीयन मैल प्रती तासांपेक्षा अधिक आहे.
