बर्लुस्कोनींच्या सहकारी महिला दोषी

रोम : इटलीचे भूतपूर्व पंतप्रधान एस. बर्लुस्कोनी यांच्या मद्यधुंद पार्ट्यांसाठी अल्पवयीन वेश्यांना भरीस घालून त्यांच्या निवासस्थानी आणल्याच्या प्रकरणात तिघां महिलांना एका विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. बर्लुस्कोनी हे अतीशय रंगीले गृहस्थ म्हणून प्रसिध्द आहेत आणि ते पंतप्रधान असताना त्यांच्या बंगल्यावर ज्या पार्ट्या होत असत त्यांची फार चर्चा चालत असे. त्या पार्ट्यांना बंगा बंगा पार्टी म्हणून ओळखले जात असे. अशा एका पार्टीसाठी लहान मुलींना आणणार्‍या तीन महिलांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना आता पाच ते सात वर्षाची कैदेची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

खुद्द बर्लुस्कोनी यांना गेल्या २४ तारखेला याच संबंधात सात वर्षाची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ७६ वर्षे वयाच्या बर्लुस्कोनी यांनी १३ वर्षाच्या एका मुलीला आपल्या पार्टीमध्ये पाचारण केले आणि शरीर सुखाच्या बदल्यात पैसे दिले असा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून बर्लुस्कोनी यांनी ही मुलगी आपल्या बंगल्यावर मोलकरीण म्हणून आली होती आणि तिने चोरी केलेली आहे असा पोलिसांना फोन केला मात्र हा बहाणा पचला नाही आणि बर्लुस्कोनींना अटक झालीच.

त्यांच्या तीन सहकारी महिला आता अन्य एका प्रकरणात दोषी आढळल्या असल्या तरी त्यांची शिक्षा अद्याप निश्‍चित झालेली नाही. मात्र मिलान शहरातल्या अनेक तरुणींनी बर्लुस्कोनींच्या बंगा बंगा पार्ट्यांची माहिती पोलिसांना द्यायला सुरूवात केली आहे. त्यापैकी काहींच्या माहितीवरून या तिघींची शिक्षा निश्‍चित केली जाणार आहे.