पुणे,दि.19:सासवडयेथे होणार्या 87व्या अखिलभारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराष्ट्राचे थोर कवी ना.धो महानोर व शिरिष पै यांची नावे आली आहेत. पण या दोन्ही उमेद्वारांची भूमिका अशी आहे की, हे पद त्यांना निवडणूक न होता किंवा बिनविरोध पद्धतीने मिळावे.साहित्यिकांच्या दृष्टीने सासवड आचार्य अत्रे यांचे जन्मगाव असल्याने ती साहित्यनगरीही आहे. पुरंदर किल्ला, कर्हा नदी व जेजुरीचा खंडोबा यांच्या पार्श्वभूमीमुळे ती इतिहासनगरी व संस्कृतीनगरीही आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपान महाराज यांच्या समाधीमुळे ती भक्तीनगरीही आहे. यापार्श्वभूमीवर तेथे होणारे साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संमेलनच होणार आहे.
सन्मानाने किंवा बिनविरोध अध्यक्षपद दिले तर आपल्याला अध्यक्षपद भूषवायला आवडेल, असे पै यांनी सांगितले असल्याची माहिती आचार्य आत्रे स्मृती प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष अॅड. बाबुराव कानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद भूषविलेल्या महिलांचे संख्या कमी आहे. यापूर्वी कुसूमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे. यंदाचे साहित्य संमेलन हे अत्रेंच्या गावी होत आहे. त्यामुळे पै यांची कारकिर्द व वय लक्षात घेता अध्यक्षपदाचा मान पै यांना सन्मानाने द्यावा अशी मागणी कानडे यांनी केली आहे. दरम्यान, पै यांच्या आधी साहित्यिक ना.धो.महानोर यांनीही सन्माने अध्यक्षपद बहाल केल्यास स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. पै यांची ग्रंथसंपदा पन्नासहून अधिक आहे. तसेच त्यांनी अत्रेच्या निधनानंतर ‘मराठा’ दैनिकाचे व साप्ताहिक ‘नवयुग’ याचे संपादकीय पद सांभाळले आहे.
महानोर हे या युगाचे कवी मानले जातात. ते जर इंग्रजीभाषेत लिहिणारे झाले असते तर त्यांना साहित्यातील ऑक्सर मिळाले असते असेही मानणारा वर्ग महाराष्ट्रात आहे.