स्नोडेनला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची शिफारस

वॉशिग्टन दि.१८- अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्त तपास संस्थेची महत्त्वाची गुपिते फोडणार्‍या एडवर्ड स्नोडेन याला यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जावा अशी शिफारस स्वीडीश प्रोफेसर स्टीफन स्वालफार्स यांनी केली आहे.

स्टीफन यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याने अमेरिकेकडून सुरू असलेली लोकांची माहिती जमविण्याची अघोरी हेरगिरीची पद्धत जगासमोर आणून मोठेच काम केले आहे. हे एतिहासिक गुपित जगापुढे आणण्यासाठी त्याला स्वतःच्या जीवाची बाजी लावावी लागली आहे व त्यामुळेच तो नोबेल पुरस्कारासाठी योग्य आहे. स्नोडेनने आपल्या वर्तणुकीतून मूलभूत हक्क व स्वातंत्र्यासाठी जगाच्या कोणत्याही देशाचा नागरिक ठाम उभा राहू शकतो असा विश्वास जगातील नागरिकांना दिला आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.

स्टीफन म्हणतात. २००९ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना नोबेल पुरस्कार देण्याचा निर्णय घाईघाईत घेतला गेला आणि तो योग्य नव्हता हे आता स्पष्ट झाले आहे. त्या चुकीचे परिमार्जन करण्याची चांगली संधी आता आली असून स्नोडेनला हा पुरस्कार देऊन नोबेल पुरस्काराची कमी झालेली किमत पुन्हा प्राप्त होऊ शकणार आहे.