
सिंधुदुर्ग : मागील दोन दिवसांपासून तळकोकणात मुसळधार पाऊस पडत असून 18 जुलैपर्यंत सिंधुदुर्गात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आणखी चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तळकोकणात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी
गेले तीन दिवस मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे मालवण तालुक्यातील मसुरे पंचक्रोशीत जनजीवन विस्कळीत झाले आहे. रमाई नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मालवण बेळणे कणकवली मार्गावरील बागायत येथे पुराचे पाणी थेट बागायत तिठा येथील बाजारपेठे नजीक पोचले होते. वडाचापाट गोळवण मार्गावर वडाचापाट येथे तर पोईप धरणावर पाणी असल्याने हा मार्ग सुद्धा वाहतुकीस बंद झाला आहे.
गड नदीला सुद्धा पूर आल्याने भगवंतगड कॉजवे पाण्याखाली गेला होता. तसेच पालयेवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्याने बांदिवडेत पोहोचणारे रस्ते बंद झाले आहेत. नदीचे पाणी शेतीतून प्रवाहीत होऊन वाहत असल्याने भात शेती लावणी वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास मसुरेसह वेरळ, बागायत आदी भागातील शेतीचे नुकसान होणार आहे.
प्रशासनाने कुडाळ तालुक्यातील कर्ली नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाने काल रात्री आंबेडकरनगर येथील पुरामुळे बाधित झालेल्या 6 कुटुंबातील 25 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित केले आहे. रात्री साडे आठ वाजता कुडाळ पावशी येथील भंगसाळ पुलाजवळ मोजलेल्या पाणी पातळीनुसार कर्ली नदीची पातळी 9 मीटर एवढी होती. पण आता पाणी ओसरत आहे.
जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील भेडशी काजवेवर गाडीसह अडकलेल्या आंध्र प्रदेशातील पाच युवकांची भेडशीतील युवकांनी सुखरुप सुटका केली. गोवा येथुन आंध्रप्रदेश येथे परत असताना भेडशी काँजवेवर असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने गाडीसह ते पाचजण अडकले होते. त्यातील प्रथम तिघेजण बाहेर पडले. तर अन्य दोघे गाडीत अडकून पडले होते. ही घटना समजताच भेडशीतील युवक घटनास्थळी दाखल झाले. पर्यायी मार्गाच्या बाजूने जात त्या काजवे जवळच्या रस्त्यावर असलेल्या कंबरभर पाण्यात उतरुन जात गाडीजवळ पोहचले. गाडीतून दोघांना सुखरूप बाहेर काढले. काही काळाने पाणी कमी झाल्यावर ते वाहन सुरक्षित ठिकाणी आणून ठेवले.
