जर्मन विद्यापीठाच्या मदतीने पुणेविद्यापीठात वैमानिक अभ्यासक्रम

pioletपुणे, दि. 17 : जर्मनीतील विद्यापीठांच्या मदतीने पुणे विद्यापीठाने वैमानिकासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून त्यातील दीडवर्षे जर्मनीत जावून शिक्षण घेण्याचा आहे.बी.ई., बी-टेक च्या विद्यार्थ्यांसाठी एमटेक इन एव्हिएशन हा तो अभ्यासक्रम आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी एमएमएलचे सीईओ उर्लिक लाँगनेक, सीटीओ स्टीमन मॉक्सलँड, नरेश खेमानी यांच्यसह उपकुलसचिव, बीसीयूडी संचालक उपस्थित होते. बॅचलर इन इंजिनिअरिंग (बीई) आणि बॅचरल इन टेक्नॉलॉजीच्या (बी.टेक) विद्यार्थ्यांना हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येणार आहे. एम टेक इन एव्हिएशन टेक्नॉलॉजी ही पदवी या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाच्या वतीने दिली जाईल. वैमानिक होण्यासाठीचा हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून यामध्ये चार सेमीस्टर होणार आहेत. पहिल्या दोन वर्षी या अभ्यासक्रमाला 24 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पहिले सेमीस्टर पुणे विद्यापीठाच्या टेंक्नॉलॉजी विभागात होईल तर उर्वरित तीन सेमीस्टर जर्मनीमध्ये एमएमएलच्या सहकार्याने पार पाडले जाणार आहेत. पुणे विद्यापीठातून जर्मनीला गेल्यावर या विद्यार्थ्यांना विमान उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना सुमारे आठशे तासांचे प्रशिक्षण मिळणार आहे. या बरोबरच हा अभ्यासक्रम पूर्ण करताच विद्यार्थ्यांना एशिया पॅसीफिक आणि युरोपात विमान उड्डाणासाठी आवश्यक असलेला परवाना मिळणार आहे. ज्याला एलबीए आणि बीजीएलची मान्यता आहे, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.

एमटेक इन एव्हिएशन हा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम मागील सहा महिन्यांपासून हाती घेण्यात आले होते. पुणे विद्यापीठाचे विविध विभाग आणि एमएमएलच्या कर्मचार्‍यांनी यावर कार्य केले आहे. या अभ्यासक्रमासाठी सुमारे 50 ते 55 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये मेडिकल, विमान उड्डाण प्रशिक्षण, लायसन्स आदींच्या खर्चाचा समावेश आहे. अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना बँक लोन उपलब्ध करून देण्याबरोबरच जर्मनीत वर्क परमिट देण्याविषयी जर्मन दुतावासाशी चर्चा सुरू आहे.

Leave a Comment