झोमॅटोचा आयपीओ खुला होताच रिटेल पोर्शन 1.38 पटींनी सबस्क्राईब


मुंबई : आजपासून फूड डिलिव्हरी कंपनी असलेल्या झोमॅटोचे आयपीओ खुले झाले आहेत. गुंतवणूकदारांचा त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. या आयपीओला 9,375 कोटी रुपयांपासून सुरुवात झाली असून 12 वाजेपर्यंत रिटेल पोर्शनचे 1.38 टक्क्यांनी सबस्क्रिप्शन झाले होते. रिटेल गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के हिस्सा हा झोमॅटोने रिझर्व्ह ठेवला होता. 16 जुलै रोजी झोमॅटोचा हा आयपीओ बंद होणार आहे.

आयपीओ सुरु करणारी झोमॅटो ही पहिलीच फूड डिलिव्हरी कंपनी आहे. या कंपनीचे व्हॅल्यूएशन सध्या जास्त असल्यामुळे याच्या आयपीओत गुंतवणूक करण्याचा सल्ला अर्थतज्ज्ञांकडून दिला जात आहे. सध्या झोमॅटोच्या आयपीओची प्राईस बँड ही 72 ते 76 रुपये एवढी आहे. त्यामध्ये 195 शेअर्सचा एक लॉट उपलब्ध असेल. कंपनीच्या नियमानुसार, गुंतंवणूकदार हे कमाल 13 लॉट घेऊ शकतात. तसेच कंपनीच्या नियमानुसार एक गुंतवणूकदार हा दोन लाख रुपयांहून जास्त गुंतवणूक करु शकत नाही.

आयपीओच्या आधारे किंमत काढली तर झोमॅटोचे बाजारातील मूल्यांकन हे 64,365 कोटी रुपये एवढे आहे. झोमॅटो एक रेस्टॉरंट अॅग्रिगेटर आहे. ग्राहकांना या कंपनीकडून रेस्टॉरंटमधून फूड डिलिव्हर केले जाते. तसेच या हॉटेल आणि रेस्टॉरंटचे रिव्ह्यूदेखील दिले जातात, त्यांचे मार्केटिंग केले जाते. या कंपनीचा कोणताही प्रमोटर नाही. या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये इन्फो एज, अॅन्ट फायनान्शियल आणि उबेरचा समावेश आहे.

झोमॅटोच्या महसूलात गेल्या वर्षी 96 टक्क्यांची वृद्धी झाली होती. सन 2019 साली झोमॅटोचा महसूल हा 1398 कोटी रुपये एवढा होता. गेल्या वर्षी म्हणजे 2020 साली त्यामध्ये वाढ होऊन, तो 2743 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी झोमॅटोला 403 मिलियन ऑनलाईन ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्याचा आकडेवारीत हिशोब केला, तर तो 11,221 कोटी रुपये एवढा आहे. गेल्या वर्षी झोमॅटोने दोन लाख डिलिव्हरी पार्टनर्सच्या माध्यमातून भारतभरात जवळपास 500 शहरांत फूड डिलिव्हरी केली होती.