पुणे दि.१७- सुप्रीम न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने आठ वर्षांपूर्वी राज्यातील डान्सबार वर घालण्यात आलेली बंदी उठविल्याने या व्यवसायात पूर्वी असलेल्या ५० हजारांहून अधिक मुलीपैकी किमान ३० हजार मुली तरी डान्सबार मध्ये परत येतील असा अंदाज वर्तविला जात आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात किमान दहा तरी डान्सबार सुरू होतील असे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार डान्सबार वर बंदी येण्याअगोदर पुणे परिसरात परवाना असलेले तीन डान्सबार होते तर विनापरवाना डान्सबारची संख्या १० पेक्षा अधिक होती. जुना मुंबई पुणे रस्ता, वडगांव मावळ, लोणी काळभोर, नारायणगांव, चाकण अशा भागात हे बार होते. आता तर चाकण येथे मोठी औद्योगिक वसाहत झाली आहे त्यामुळे येथे पुन्हा डान्सबारचे पेव फुटेल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. पूर्वी बारमालक मुंबई व नेपाळ येथून महिना पाच ते सहा हजार पगारावर नाचण्यासाठी बारबाला आणत असत असेही सांगण्यात आले.
राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे माजी प्रमुख व त्याकाळात पुण्यात ग्रामीण पोलिस सुपरिटेंडेंट असलेले अशोक धिवरे म्हणाले की बार पुन्हा सुरू झाल्यास गुन्हेगारीत वाढ होण्याची भीती आहेच. आता तर चाकण परिसरात ग्रामस्थांनी जमिनी विकल्यामुळे प्रचंड पैसा आला आहे. त्यामुळे येथे बार सुरू होतील यात शंका नाहीच. अशा बारमध्ये गुन्हेगार येण्याचे प्रमाण फार मोठे असते. ग्रामीण भागातील जमीनी विकून नवश्रीमंत तरूण पैसा उडविण्यासाठी येथे येतील यातही शंका नाही. हेच तरूण गुन्हेगारांच्या संपर्कात येण्याची व त्यामुळेही गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय आहे मात्र त्यामुळे कायदा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती आहे.
पुण्यातील पहिला डान्सबार ठरलेल्या हॉटेल कपिला इंटरनॅशनलचा मालक चंद्रकांत खैरे यांचा खून झाला तेव्हा मी ग्रामीण पोलिस सुपरिटेंडेंट होतो असे सांगून धिवरे म्हणाले की तो माझ्याकडे डान्सबारचा परवाना मागायला आला होता पण मी त्याला परवाना देण्यास नकार दिला मात्र त्यानंतर त्याने मुंबर्सतून सूत्रे हलवून परवाना मिळविला. नंतर त्याचा खून झाला हे उदाहरण पुरेसे बोलके आहे.