नागपूर- गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळसह संपूर्ण विदर्भात हजरी लावली आहे. या पुरामुळे अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली असून, त्या,मुळे पिकंही धोक्यात आली आहेत. या जोरदार पावसामुळे विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
विदर्भात जोरदार पावसामुळे पूरस्थिती
यवतमाळमध्ये जोरदार पाऊस सुरूच आहे. आर्णीमधल्या अरूणावती नदीला आलेल्या पुराचे पाणी घरांत शिरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तर पांढरकवडा शहरात खुनी नदीचे पाणी वस्तीत शिरले आहे. तसेच नागपूर-तुळजापूर राज्य मार्ग बंद झाला आहे. कोपा मांडवीजवळ नाल्याला पूर आल्याने येथील वाहतूकही ठप्प झाली आहे. झरीजामनी तालुक्यातल्या दाभा, डोरली, आहेराल्ली, सतपल्ली, कमळवेल्ली ही गावंही पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्यानं वेढली असून त्यांचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात चार दिवसांत झालेल्या पावसाने २४३ घरांची पडझड झाली आहे. तसेच एक शेतमजूर वीज कोसळून ठार झाला. गोंदिया जिल्ह्यात कोसळणा-या मुसळधार पावसामुळं वाघ नदी दुथडी भरून वाहू लागलीये. आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात तब्बल १५६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
चंद्रपूर-हैदराबाद हायवे, चंद्रपूर-अहिरी मार्ग बंद झालाय. भंडा-यात अतिवृष्टीमुळं वैनगंगेनं धोक्याची पातळी गाठलीय. पुलांवरून पाणी वाहत असल्यानं अनेक रस्त्यांवरील वाहतूकठप्प झाली आहे.
