छापरा (बिहार) – मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, बिहारच्या छापरा जिल्ह्यात सरकारी शाळेत शिकणार्या मुलांना मोफत पुरविण्यात येत असलेले मध्यान्ह भोजन खाल्ल्याने अकरा मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर 50 मुलांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे.
मध्यान्ह भोजनाअंतर्गत तयार करण्यात आलेली खिचडी खाऊन 50 शाळकरी मुलांना विषबाधा झाली होती. 8 ते 12 वयोगटातील या सर्व मुलांना तत्काळ छापरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यातील अकरा मुले दगावली आहे. अजूनही बर्याच मुलांची प्रकृती अद्याप नाजूक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहे. या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्टेशनला घेराव घालत शाळेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन योजनेंतर्गत मधल्या सुटीत खिचडी दिली जाते. सर्व विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली होती. त्यानंतर एका मागून एक विद्यार्थी अस्वस्थ झाल्याचे शाळेच्या प्रशासनाने सांगितले आहे.शाळा प्रशासनाने तत्काळ विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवले. परंतु, आठ विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. 50 विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
त्या विद्यार्थ्यांना पाटणा येथील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छपरा ते पाटणा हे अंतर 100 किलोमीटर इतके आहे. प्रशासकीय अधिकारी रग्णालयात दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेवर हल्लाबोल केला असून शाळेच्या संचालकांना अटक करण्याची मागणी केली आहे. काही पालक रस्त्यावर उतरले असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे.
दुसरीकडे, याघटनेनंतर भारतीय जनता पक्षाने नीतीश सरकारवर आगपाखड सुरु केली आहे. प्रत्येक मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना 10 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपने केली आहे. मशरक येथील धर्मासती गावातील नवसृजित प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली. जिल्हाधिकारी अभिजित सिन्हा यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या परिवाराला सरकारने, प्रत्येकी 2 लाखरूपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच ज्या 55 मुलांवर उपचार सुरू आहेत.
त्या विद्यार्थ्यांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाचे सचिव तसेच मिड डे मील विभागाचे निर्देशक छपरासाठी रवाना झाले आहेत.
सरकारने विषबाधेचे उच्चस्तरीय आदेश दिले आहेत.