राज्यातील डान्स बार पुन्हा सुरू राहणार

मुंबई: महाराष्ट्रातील डान्साबार पुन्हा सुरुच राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात पुन्हा डान्सबार चालवण्यास परवानगी मिळाली आहे.

यापूर्वी महाराष्ट्रातील राज्य सरकारने २००५ मध्ये डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला डान्सबार चालकांच्या संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कोणाचा रोजगार हिरावून घेण्याचा अधिकार सरकारला नाही, असे सांगत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानेही सुनावणीच्यावेळी डान्सबार असोसिएशनच्या बाजूने निर्णय दिला होता.

डान्सबारवरील बंदी उठवण्याचा निर्णय दुर्दैवी असुन कोर्टासमोर बाजू मांडण्यास सरकार कमी पडले, सरकारची इच्छाशक्ती कमी असल्याची प्रतिक्रीया भाजपच्यावतीने देण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आनंद झाला. कोर्टाने माणुसकीला न्याय दिला. डान्सबार बंदीमुळे अनेक तरूणी बेरोजगार झाल्या होत्या. अनेकांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या निर्णयाने त्या सर्वांना न्याय मिळाला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे डान्स बार संघटनेने म्हटले आहे.