दहावी, बारावीची परीक्षा 25 सप्टेंबरपासून

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावी, बारावीच्या सप्टेंबरमधील लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या दोन्ही वर्गाच्या परीक्षांची सुरूवात 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेच्या संदर्भातील सर्व माहिती शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
दहावीची परीक्षी 25 सप्टेंबर पासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत चालेल तर बारावीची परीक्षा नऊ ऑक्टोबर रोजी संपणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय प्रभारी सचिव सु.बा.गायकवाड यांनी दिली. दहावी, बारावीच्या श्रेणी व तोंडी परीक्षा ही 11 ते 21 सप्टेंबर दरम्यान होतील. तर याच दरम्यान दहावीची तंत्र व पूर्व व्यावसायिक परीक्षा 11 ते 14 सप्टेंबर या कालावधीत घेतली जाईल. यात विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा ही संबंधित परीक्षा केंद्रावरच घेण्यात येईल.

अंध, मुकबधीर अपंग, बहुविकलांग अध्ययन अक्षमता वैगुण्य असलेल्या अपंग विद्यार्थ्यांच्या कार्यानुभव विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षाही 11 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान होईल. राज्यात दहावी, बारावीची परीक्षा ही शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येईल. मुंबई विभागातून या दहावी बारावीच्या परीक्षेला सुमारे दोन लाखांच्या दरम्यान विद्यार्थी बसणार आहेत.

बारावीच्या नियमित व पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा यंदाही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची ऑन लाइन परीक्षा ही कनिष्ठ महाविद्यालयातील संगणकांची मर्यादा लक्षात घेता ती एकाच वेळी न घेता गटागटाने घेण्याची मुभा देण्यात आली आहे.