अ. भा. मराठी साहित्य संमेलन सासवड येथे

पुणे, दि. 14 – प्रसिद्ध साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ अचार्य अत्रे यांचे जन्मस्थान अणि संतांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सासवड येथे अगामी 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी संमेलनस्थळाची अधिकृत घोषणा रविवारी पत्रकार परिषदेत केली.

महामंडळाचे उपाध्यक्ष सुरेश नाईक, कोषाध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाहक प्रकाश पायगुडे, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विजय कोलते आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, अ. भा. साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड येथील लेखक-कवींचा समूह अशी दोन निमंत्रणे आली होती. महामंडळाच्या स्थळ निवड समितीने या दोन्ही स्थळांची पाहणी केली. त्यानंतर स्थळ निश्‍चित करण्यात आले. त्यापूर्वी पिंपरी येथील साहित्यिकांच्या गटाने महाराष्ट्र साहित्य परिषदेला पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत असून त्याची आचारसंहिता संमेलनाचे आयोजन करण्यामध्ये अडसर ठरू शकते, असे सांगत संमेलन घेण्यास असमर्थता दर्शविली होती. तसेच शनिवारी स्थळनिवड समितीने पिंपरीला भेट दिली असता त्यांची कोणतीही तयारी नसल्याचे आढलून आल्याने संमेलन सासवडलाच होणार हे निश्‍चित झाले होते.

मसाप शाखा आणि आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर यांच्याकडे आयोजकत्व असलेले सासवड येथील नियोजित 87 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन या वर्षी डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. सासवड येथील 4 एकर संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी तळावर हे संमेलन भरवण्यात येईल. तसेच दौलत चित्रपटगृह, आचार्य अत्रे सभागृह आणि सांस्कृतिक भवन येथेही कार्यक्रम घेतले जाणार आहेत. पुरंदर तालुक्यात ग्रामीण भागात होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन ठरणार आहे. यापूर्वी 1998 मध्ये आचार्य अत्रे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि 2011 मध्ये सासवड येथून संमेलनासाठी निमंत्रण आले होते. अखेर तिसर्‍या निमंत्रणाच्या वेळी सासवडला सारस्वतांचा मेळा भरविण्याचे निश्‍चित झाले. साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शन समितीच्या सुचनांनुसार संमेलनाची तयारी आयोजक सूरू करणार आहेत.

बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार्‍या अचार्य अत्रेंच्या जन्मगावी संमेलन होत आहे, याचा आनंद झाला आहे. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात घेण्यात येणारे हे 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साधे पण उत्तमरित्या भरवण्यात येणार आहे. त्यामुळे संमेलन खर्चाच्या आकड्यांचा बाऊ नाही. कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन कमी पैशात चांगल्या प्रकारे संमेलन भरवण्याचा पायंडा पाडणार आहोत, असे आचार्य अत्रे विकासप्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विजय कोलते यांनी बोलून दाखविले आहे.