रांची – झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ झारखंड मुक्ती मोर्चाचे गटनेते हेमंत सोरेन यांनी शनिवारी सकाळी घेतली. झारखंडमध्ये काँग्रेस, झामुमो आणि राजदने मिळून आघाडी सरकार स्थापन केले आहे. राज्यपाल सय्यद अहमद यांनी त्यांना राजभवनातील बिरसा मंडप येथे पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी सोरेन यांच्यासह कॉग्रसचे राजेंद्र प्रसाद सिंह, आणि राष्ट्रीय जनता दलाच्या अन्नपूर्णा देवी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा शिबू सोरेन यांचे हेमंत सोरेन हे चिंरजीव आहेत. १५ नोव्हेंबर २००० रोजी स्वतंत्र झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर तेरा वर्षातील हेमंत सोरेन हे नववे सरकार आहे. झारखंडमधून राष्ट्रपती राजवट हटविण्यात येत असल्याचे, राष्ट्रपती भवनातून राजभवनाला सूचित करण्यात आल्यानंतर शुक्रवारी रात्री राज्यपालांनी हेमंत सोरेन यांना शपथविधीसाठी निमंत्रित केले. ९ जुलै रोजी झामुमोने सरकार स्थापनेचा दावा केला होता. ८२ सदस्यांच्या झारखंड विधानसभेमध्ये हेमंत सोरेने यांनी ४३ आमदारांच्या पाठिंब्याची यादी राज्यपालांना दिली.
विधानसभेत बहुमत सिध्द झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. झामुमोने ८ जानेवारीला भाजपच्या अर्जून मुंडा सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. काँग्रेसने मुख्यमंत्रीपद झामुमोला दिले असले तरी, त्याबदल्यात आगामी लोकसभेच्या निवडणूकीत नऊ ते दहा जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.