डॉक्टर्स डे- डॉ. आनंदीबाई जोशी, देशातील पहिल्या महिला डॉक्टर

१ जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून देशात साजरा होतो. डॉ. विधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथी स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. करोना काळात डॉक्टरांनी मोठे योगदान दिले असून जणू भगवान रुपात डॉक्टर्स कडे पाहिले जात आहे. अश्या वेळी देशातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या विषयी जाणून घेणे योग्य ठरेल.

महाराष्ट्रात रुढीवादी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या आनंदीबाई यांचे माहेरचे नाव यमुना. ३१ मार्च १८६५ रोजी जन्माला आलेल्या या यमुनेचे लग्न त्यावेळच्या प्रथेप्रमाणे वयाच्या ९ व्या वर्षी झाले. पती गोपालराव होते २५ वर्षाचे. यमुना साक्षर नव्हती त्यामुळे लग्न झाल्यावर शिक्षण घेईन या अटीवर हे लग्न झाले होते.

शिक्षण सुरु झाले खरे पण त्यात लग्नानंतर आनंदी नाव मिळालेल्या आनंदीबाईना रुची वाटत नव्हती. पतीचा राग, हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. त्यात वयाच्या १४ व्या वर्षी जन्म दिलेला मुलगा अवघ्या १० दिवसात मरण पावल्याचे दुःख सहन करावे लागले. त्यातूनच त्यांनी डॉक्टर होण्याचा निश्चय केला.

पती गोपाळराव यांनीही अनेक हालअपेष्टा सोसून आनंदीबाई याना पेनसिल्व्हेनिया वूमन्स मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायला लावला. त्याकाळी जगात फक्त दोन महिला मेडिकल कॉलेज होती त्यातील हे एक होते. १९ वर्षाच्या आनंदीबाईनी हा कोर्स पूर्ण करून डॉक्टर पदवी मिळविली आणि त्या भारतात परतल्या. भारतातील त्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या.

कोल्हापूर मधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल मध्ये त्यांना महिला वॉर्ड प्रमुख डॉक्टर म्हणून नोकरी मिळाली. पण अमेरिकेतील विषम हवामानात आनंदीबाई यांची तब्येत खराब होऊन त्यांना क्षय बाधा झाली होती. परिणामी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांना मृत्यू आला.