परदेशी जाणाऱ्या आणि कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना अडचण

भारतात करोना लसीकरण वेगाने सुरु असून अनेक नागरिकांना कोविशिल्ड लसीचे डोस मिळाले आहेत. मात्र अनेक देशांनी अद्यापी कोविशिल्ड लसीला मान्यता न दिल्याने परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या भारतीयांना अडचण निर्माण झाली आहे. युरोपीय संघाचे सदस्य असलेल्या अनेक देशांनी डिजिटल वॅक्सिन पासपोर्ट देण्याची सुरवात केली आहे. यामुळे युरोपीय नागरिकांना काम किंवा पर्यटन यासाठी येण्याजाण्याची ही स्वतंत्र रूपातील परवानगी मानली जात आहे.

वॅक्सिन पासपोर्ट हा संबंधित व्यक्तीला लस दिली गेल्याचे प्रमाणपत्र आहे. काही दिवसापूर्वी याच संघाने कोणतीही लस दिली गेली असली तरी वॅक्सिन पासपोर्ट द्यावा अशी शिफारस केली होती. मात्र आता काही तांत्रिक कारणाने युरोपीय संघ सदस्य देशांनी मान्यता दिलेल्या लसी साठीच असे पासपोर्ट देता येतील असे म्हटले आहे. या देशात सध्या फक्त चार लसीना परवानगी आहे. त्यात फायझर, मॉडर्ना, एस्ट्राजेनेका आणि जॉन्सन या लसींचा समावेश आहे.

पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या एस्ट्राजेनेकाचेच कोविशिल्ड हे संस्करण आहे. मात्र त्याला युरोपीय बाजारासाठी युरोपीय मेडिकल एजन्सीने मान्यता दिलेली नाही. यामुळे युरोपीय देशात जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना अडचण आली आहे.