सराफांकडून सोने नाणी आणि बार विक्री बंद

मुंबई दि.११ – सरकारची चालू खात्यातील वाढती तूट पाहता सरकार ज्या उपाययोजना आखत आहे त्याला हातभार म्हणून देशातील सराफांनी सहा महिने ग्राहकांना सोन्याची नाणी अथवा सोन्याच्या लडी, बिस्कीटे विकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी सरकारने सोने आयातीवरील निर्बंध वाढविले आहेत. सराफांनी सरकारच्या या प्रयत्नांना आपल्यापरिने हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.

या विषयी बोलताना ऑल इंडिया जेम्स ज्युवेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरेश सोनी म्हणाले की आमच्या संघटनेचे ४० हजार सदस्य असून या सर्वांना संघटनेने किमान सहा महिने सोने नाणी,बिस्कीटे अथवा बार विक्री करू नये असे आवाहन जूनमध्येच केले आहे आणि ६५ टक्के सदस्यांनी त्याला मान्यता दर्शविली आहे. आमच्या एकूण व्यवसायातील ३५ टक्के व्यवसाय हा नाणी , बार व बिस्कीटे विक्रीतून होत असतो.

सध्या आपला देश अडचणीत आहे. चालू खात्यातील तूट ४.८ टक्कयावर गेली आहे. त्यात सोन्याच्या आयातीसाठी मोजावा लागणारा पैसा हे महत्त्वाचे कारण आहे. इंधन आयातीचा या बाबत पहिला नंबर आहे तर सोने आयातीचा दुसरा नंबर आहे. सरकार सोने आयातीवर निर्बंध घालत आहे तसे आयात शुल्कातही वाढ केली गेली आहे. सराफ व्यावसायिकांनीही सरकारच्या या प्रयत्नांना आपल्यापरिने हातभार लावण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय आम्ही ऐच्छिक रित्याच घेतला आहे. त्यामुळे पुढील किमान सहा महिने तरी सोने नाणी विक्री बंद ठेवली जाणार आहे.